
विधानसभा निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाच आव्हान देताना नेते दिसत आहे. राजकीय प्रचारसभांमुळे बंगालमधील वातावारण ढवळून निघालं असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असा संघर्ष दिसत आहे. ममता विरुद्ध मोदी अशी शाब्दिक चकमक सध्या बंगालमध्ये सुरू आहे. बघूया कोण काय म्हणाले….(सर्व छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तृणमूल काँग्रेसचे नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये घमासान सुरू झालं आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची पहिलीच सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडलेल्या सभेत मोदींनी ममतांनी बंगालचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

मोदी म्हणाले, "डाव्या आघाडीची राजवट संपवून बंगालच्या जनतेने मोठय़ा विश्वासाने ममतांच्या हाती सत्ता सोपविली, मात्र दीदींनी केवळ आपल्या भाच्याचेच हित पाहिले." त्यांचा रोख ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे होता.

"तृणमूल काँग्रेसने लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली. त्यामुळे ममतांनी कितीही आरोप केले तरी राज्यात कमळ फुलेल," असा आरोपही मोदींनी केला.

तृणमूलच्या ‘खेल होबे’ या घोषणेची खिल्ली पंतप्रधानांनी उडवली. तृणमूल काँग्रेसचे अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी अनेक घोटाळे केले असून भ्रष्टाचाराचे ऑलिम्पिक आयोजित करता येईल अशी टीका त्यांनी केली. तुमचा खेळ संपला असून विकासाचे पर्व सुरू होईल असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांना ममता बॅनर्जी यांनीही प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधानांच्या सभेवळीचे ममता बॅनर्जी यांनी दार्जिलिंग ‘पदयात्रा’ काढली.

ममतांनी नरेंद्र मोदींच्या ‘सोनार बांगला’ या घोषणेवर निशाणा साधला. "मोदी खोटारडे आहेत. बंगालमध्ये इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या जात असताना आणि बँका विकल्या जात असताना पंतप्रधान बंगालमध्ये स्वप्ने विकायला आले."

“ते सोनार बांगलाबद्दल बोलत आहेत. पण सोनार भारताचे काय?, एलपीजीचे दर वाढत आहेत. त्यांनी दिल्लीला विकले. एअर इंडियापासून ते बीएसएनएलपर्यंत ते सार्वजनिक मालमत्ताही विकत आहेत,” असा घणाघात ममतांनी केला.

मोदी सरकारवरही ममता यांनी टीका केली आहे. देशाला नरेंद्र मोदी यांचं नाव दिलं जाईल, असंही त्या म्हणाल्या.

नंदीग्राममधील निवडणूक रॅलीत ममतांनी भाजपावर हल्लाबोल केला. हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये," असा इशारा त्यांनी भाजपाला दिला.