
सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले. दिवसभर विविध पॉईंट्सवर आणि बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी झाली. सध्या एकूणच महाबळेश्वरला जत्रेचे स्वरूप आले. (संग्रहित छायाचित्र)

या आठवड्यातील सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर एकदम हाऊसफुल्ल झाले. वाहनांच्या गर्दीने वाहतुकीची कोंडी झाल्याने पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडले. मात्र, वाहतूक नियंत्रण होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

करोनाचे सगळे निर्बंध उठल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या मोठ्या गर्दीने गजबजून गेली. सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी येथील विल्सन पॉईंट, संध्याकाळी सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी येथील मुंबई पॉईंटवर पर्यटकांची एकच गर्दी उसळली.

पर्यटक दिवसभर विविध पॉईंट्सची सफर करत आहेत. येथील अनोख्या व विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.

महाबळेश्वर येथील वेण्णा लेकवर नौकाविहार, लालचुटूक स्ट्रॉबेरी, गाजर, त्यांच्या जोडीला मक्याचे कणीस, मक्याचे पॅटीस यावर पर्यटक येथेच्छ ताव मारत आहेत.

लेकच्या चौपाटीवर भेळ पुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, पॅटीस खाण्यासाठी पर्यटकांची पावले हातगाडीकडे वळत आहेत. या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी चाही आनंद लुटत आहेत.

पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे महाबळेश्वरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी ही झाल्याचं पाहायला मिळालं.

पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीने दोन किलोमीटर अंतरात वाहनांच्या दिवसभर लागला रांगा लागल्याचे दिसून आले. त्याचबरोबर आर्थर सीट, मुंबई, केटस पॉइंट या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीत पर्यटक मोठ्या संख्येने अडकलेले दिसले.

सलग सुट्ट्यांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार याची माहिती असूनही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही नियोजन पोलिसांकडून झाले नसल्याने पर्यटकांनी संतापही व्यक्त केला.