-

सदोष मतदार याद्यांचा मुद्दा, मतदारांची दुबार नावे, कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत आज महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि मनसेकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला आहे.
-
या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे सकाळीच चर्चगेटच्या दिशेने रवाना झाले.
-
दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. मात्र ट्राफिक टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
-
त्यानुसार आज सकाळी राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकावर पोहोचले. दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी चर्चगेटला जाणारी धीम्या गतीची लोकल पकडली. मात्र गर्दीमुळे त्यांना पाच लोकल ट्रेन सोडाव्या लागल्या, अशी माहिती मिळत आहे.
-
तब्बल २० मिनिटांहून अधिकची वाट पाहिल्यानंतर अखेर राज ठाकरे यांनी चर्चगेटला जाणारी लोकल पकडली. यावेळी त्यांच्यासह मनसेचे पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच माध्यम प्रतिनिधिंचीही मोठी गर्दी होती.
-
लोकल ट्रेनच्या प्रथम दर्जाच्या डब्यात राज ठाकरे चढले. त्यांना विंडो सीट मिळाली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि वृत्तवाहिन्यांनी दाखवल्यानंतर मुंबईकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस दादरहून विंडो सीट कशी मिळाली? याचे आश्चर्य अनेकांनी व्यक्त केले आहे.
-
राज ठाकरेंच्या रेल्वे प्रवासावर काही जणांनी एक्सवरून टीका केली आहे. रोज प्रिमियम गाडीतून फिरणारे राज ठाकरे केवळ राजकारणासाठी आज रेल्वेने प्रवास करत आहेत, अशी टीका काही जणांनी केली.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी दक्षिण मुंबईत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातून धडा घेत महाविकास आघाडीचे नेते, मनसेचे नेते यांनी आजच्या मोर्चाला रेल्वेने येणे पसंत केले आहे.
-
मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी शनिवारी दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीट येथून मोर्चास प्रारंभ करून तो ४ पूर्वी संपवायचे नियोजन आहे. सदर मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ तात्पुरता मंच उभारून नेत्यांच्या भाषणाची सोय केल्याचे दिसते.
राज ठाकरेंच्या लोकल ट्रेन प्रवासाची चर्चा, ऐन गर्दीच्या वेळेला दादरहून मिळाली विंडो सीट; ट्रोलिंगही झालं
Raj Thackeray travel by Local Train: निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या सत्याच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई लोकलने प्रवास केला. (ALL Photos by RNO)
Web Title: Raj thackeray travel by mumbai local train from dadar to churchgate for mns and mva satyacha morcha kvg