बंद म्हणजे बंद! दूध-फळ-भाजीपाला मिळणार नाही; फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू
- 1 / 10
मोदी सरकारनं लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचा असंतोष बाहेर पडताना दिसत आहे. मागील दोन महिन्यांपासून पंजाब, हरयाणासह राज्याराज्यांमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली' म्हणत दिल्लीच्या सीमेवर पाऊलं ठेवलं. १२ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. (सर्व छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
- 2 / 10
शेतकऱ्यांचं म्हणणं काय? तर मोदी सरकारनं नव्याने केलेले कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० हे रद्द करावेत. कृषी मालाला हमीभाव देण्याची हमी द्यावी. त्याचबरोबर प्रस्तावित वीज कायदाही मागे रद्द करावा. (छायाचित्र/पीटीआय)
- 3 / 10
दिल्लीत दाखल झाल्यानंतर या मागण्यांवरून शेतकऱ्यांनी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारसोबत पाच वेळा चर्चा होऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.
- 4 / 10
उद्या म्हणजे ८ डिसेंबर रोजी भारत बंद पाळला जाणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत भारत बंद पुकारण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. बंद दरम्यान चक्का जाम आंदोलन केलं जाणार असल्यानं वस्तु व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात दूध, फळ, भाजीपाला यांचीही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
- 5 / 10
याचा परिणाम सकाळी घरी येणाऱ्या दूधापासून होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासह देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही बंदला पाठिंबा जाहीर केला असून, उद्या समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे फळ व भाजीपाल्याचा पुरवठाही बंद राहणार आहे.
- 6 / 10
योगेंद्र यादव यांनी भारत बंदची माहिती देताना सांगितलं की, "बंददरम्यान चक्का जाम करण्यात येणार आहे. या काळात दूध, फळ, पालेभाज्या यांची वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, विवाह सोहळे व अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नाही."
- 7 / 10
भारत बंद सकाळी सुरू होईल. याकाळात सर्व व्यवहार बंद राहतील. त्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर चक्का जाम आंदोलन मागे घेतलं जाणार आहे.
- 8 / 10
सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.
- 9 / 10
महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी संप करणार आहेत.
- 10 / 10
या संपाचा परिणाम फळ व पालेभाज्याच्या पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे उद्या दूधाबरोबरच फळ व पालेभाज्या मिळण्याची शक्यता कमीच आहे. शेतकरी नेते बलदेव सिंह यांच्या माहितीप्रमाणे भारत बंद शांततापूर्ण मार्गाने करण्यात येणार आहे. कुणालाही हिंसा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर कुणी हिंसा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. (छायाचित्र/एपी)