-
गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. परंतु, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल निसल्याचं दिसत आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
-
भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. गजानन कीर्तिकर म्हणाले, “आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे.”
-
देवेंद्र फडणवीस : “गजानन कीर्तिकरांनी असं कुठेही म्हटलं नाही. या सर्व कल्पोकल्पीत बातम्या आहेत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
सुधीर मुनगंटीवार : भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. या पक्षाचं नेतृत्व पूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करायचे आता एकनाथ शिंदे या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. युतीत एकनाथ शिंदे यांचा, शिवसेनेचा आणि त्यांच्या मागण्यांचा सन्मान होणार आहे. भारतीय जनता पार्टीला त्यांच्या २२ जागांचा दावा मान्य नाही असं तुम्हाला (माध्यमांना) कोणी बोललं नाही.
-
मुनगंटीवार म्हणाले, २२ जागांचा दावा भाजपाला मान्य नाही, असं कोणतंही वक्तव्य भाजपाच्या कुठल्याही नेत्याने केलं नाही. जागावाटपावर भाजपाकडून कोणी काही बोललंय का, किंवा आमच्यापैकी ती मागणी कोणी नाकारली आहे का? विधानसभेच्या जागांचं वाटप असेल किंवा लोकसभेचा प्रश्न असेल आम्ही एकत्र आहोत, एकत्र विचार करतो, एकत्र बसून निर्णय घेतो.
-
एकनाथ शिंदे : गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि भाजपा मित्र आहेत. त्यात निवडणुकीला आणखी वेळ आहे. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होईल. कोणाला काहीही करण्याची आवश्यकता नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
-
संजय राऊत : “गजानन कीर्तीकर बोलतायत, की त्यांच्या गटाबरोबर सापत्न वागणूक केली जात आहे. त्यांना अपमानित केलं जात आहे. मग आम्ही काय वेगळं सांगत होतो?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
-
संजय राऊत : “भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक करते. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याच्या भूमिकेतून भाजपा काम करत होती. म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो. भाजपा एक अजगर किंवा मगर आहे. आत्तापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकलं. आता शिंदे गटाला अनुभव येतोय. त्यांना हळूहळू कळेल की उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती”
-
संजय राऊत म्हणाले, “माझ्याकडच्या माहितीनुसार फुटलेल्या गटात अस्वस्थता आहे. नाराजी आहे. फुटलेल्या गटातही दोन गट पडले आहेत. कीर्तीकरांनी सांगितलेली भूमिकाच शिवसेनेची पहिल्यापासून होती. त्याच चिडीतून आम्ही भाजपापासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाही, सत्तेत असताना आपल्या लोकांना निधी मिळू दिला नाही.
-
संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या प्रमुख लोकांना भाजपाने अपमानित करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. अशावेळी महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली. तेच गजानन कीर्तीकर सांगतायत की आम्हाला लाथा घालतायत, आम्हाला नीट वागणूक देत नाहीत”
-
चंद्रकांत खैरे : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मी स्पष्ट सांगतोय यांची (भाजपा – शिंदे गट) आपसात भांडणं सुरू झाली आहेत. गजाभाऊ कीर्तिकर यांनी सांगितलं की आमची कामं होत नाहीत ते खरंच आहे. आता त्यांना सजलंय की आपण चूक केली आहे.
-
चंद्रकांत खैरे म्हणाले, गजाभाऊ अगदी करेक्ट ट्रॅकवर आले आहेत. त्यांना माहितीय आता आपलं काही खरं नाही. आगामी लोकसभेला त्यांच्या मुलाला त्यांच्याविरोधात उभं केलं जाऊ शकतं, त्यामुळे ते चिंतेत आहेत.

“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य