-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या कुटुंबासाठी सध्या आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. त्यांची कन्या सृष्टी नांदगावकरने (Srushti Nandgaonkar) अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ (USC) येथून लॉ (कायदा) या विषयात मास्टर्स पदवी पूर्ण केली आहे.
-
लेकीच्या या यशाचे कौतुक करताना बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली असून, आपल्या यशाचे श्रेय थेट ‘ठाकरे कुटुंबा’ला दिले आहे.
-
सृष्टीच्या पदवीप्रदान सोहळ्यातील काही सुंदर फोटो शेअर करत नांदगावकर यांनी त्यांच्या संघर्षाला आणि ठाकरे कुटुंबासोबतच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.
-
आपल्या भावना व्यक्त करताना बाळा नांदगावकर म्हणाले, “तरुणपणी मला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. मात्र वयोमर्यादेमुळे माझे ते स्वप्न अपूर्ण राहिले. पण त्यानंतर मी ‘शिवसैनिक’ झालो आणि तिथेच माझ्या जीवनाचे सोने झाले. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या परिसस्पर्शाने माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.”
-
“मला स्वतःला लॉ चे शिक्षण घेऊन वकील होण्याची तीव्र इच्छा होती. परंतु, तत्कालीन आर्थिक परिस्थितीमुळे मला ते शक्य झाले नाही. आज माझी कन्या सृष्टी हिने ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ सारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून लॉ मध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे, यासाठी प्रत्येक आई-वडील आयुष्यभर झटत असतात. आज सृष्टीने आमच्या कष्टाचे चीज केले,” असे सांगत नांदगावकरांनी एका पित्याचा अभिमान व्यक्त केला.
-
आपल्या यशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या योगदानाचा उल्लेख करत ते म्हणाले, “माझ्या कुटुंबात काहीही चांगले घडत असेल, तर त्यात माननीय राज साहेब आणि शर्मिला वहिनी यांचा मोठा वाटा असतो. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच सृष्टी आज हा टप्पा गाठू शकली.”
-
“एवढेच नव्हे तर, या कोर्सदरम्यान कोविड परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः सृष्टीला वेळ देऊन मार्गदर्शन केले होते.”
-
सृष्टीची आता जगप्रसिद्ध ‘जिनेव्हा अकॅडमी’च्या पुढील कोर्ससाठी देखील निवड झाली आहे.
-
या दुहेरी आनंदाच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर म्हणाले, “मागे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवते की, ठाकरे कुटुंबाच्या कृपेनेच माझ्या आयुष्याचे सोने झाले. मी कायम या कुटुंबाच्या ऋणात राहीन. आपण न मागता फक्त सत्कर्म करत राहावे, ‘मांगे मिले ना भीक, बिन मांगे मिले मोती’ या म्हणीचा प्रत्यय मला माझ्या आयुष्यात आला आहे.”
-
सध्या सोशल मीडियावर बाळा नांदगावकर यांच्या या पोस्टची आणि सृष्टीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : बाळा नांदगांवकर/इन्स्टाग्राम)
ऐतिहासिक क्षण! अशोक सराफ Cannesच्या रेड कार्पेटवर, अंकिताच्या साडीवर ‘ते’ खास डिझाइन, कोकणाशी आहे कनेक्शन