-
किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
-
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी गडावर विशेष उपस्थिती लावली होती.
-
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि विविध शिवभक्त संघटनांच्या वतीने या सोहळ्याचे नेटके आयोजन करण्यात आले होते.
-
दोन दिवस चालणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्याला शुक्रवारी दुपारपासूनच सुरुवात झाली होती. यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले होते.
-
गडपूजन आणि आदिशक्ती शिरकाई देवीच्या पूजनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला, ज्यानंतर महाराजांचा पारंपारिक तुलादान सोहळा पार पडला.
-
शुक्रवारी रात्री राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि महिमा सांगणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
यावेळी शाहिरांनी डफावर थाप मारत सादर केलेल्या पोवाड्यांनी उपस्थित शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले.
-
आज पहाटे सनई-चौघड्यांच्या सुरांमध्ये ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाने मुख्य सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर, राज्यातील विविध पवित्र नद्यांमधून आणलेल्या जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्रोच्चारात जलाभिषेक घालण्यात आला.
-
यानंतर राजसदर ते होळीचा माळ आणि तेथून छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळापर्यंत भव्य पालखी सोहळा काढण्यात आला.
-
महाप्रसादाने या दिमाखदार सोहळ्याची सांगता होणार आहे. सध्या संपूर्ण गडावर चैतन्याचे वातावरण असून, पारंपारिक वेशभूषा केलेले शिवभक्त आणि त्यांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण गडपरिसर दुमदुमून गेला आहे. तसेच, होळीच्या माळावर शिवकालीन मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत.
-
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी १५०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
शिवभक्तांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गडावर ठिकठिकाणी आरोग्य पथके, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
तसेच पाचाड (तळगड) येथून शिवभक्तांना किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ये-जा करण्यासाठी मोफत एसटी बस सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ