-
राज्याचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची आज जयंती आहे. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मित निधनामुळे अवघा देश हळहळला होता.
-
अजित पवार यांचे मोठे बंधू आणि रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी काही जुने फोटो शेअर करत सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
-
“२२ जुलै, आज तू ६७ वर्षे पूर्ण केलीस, म्हणजेच माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान. डोळ्यांसमोरून सारा जुना काळ सरकतोय. आपण ४-५ वर्षांचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जायचा आणि मला अंधाराची भीती दाखवायचा. उन्हाळ्यात कालव्यात पोहून रस्त्यावरील धुळीत आपण लोळायचो. त्यावेळी आपण पाटकऱ्याला घाबरायचो, पण पुढे जाऊन मोठ्यापणी तू त्याच खात्याचा मंत्री झालास.”
-
“शाळेचे सर्टिफिकेट आणताना घाबरून घरी न जाता मुंबईला शाळा उघडेपर्यंत चौपाटीवरच बसून राहिलो. रस्त्यावरून जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून ‘आपण असे कधी होणार?’ असे म्हणता-म्हणता तू खरंच मंत्री झालास. आपण दोघांनीच तात्यासाहेबांचे पंचगंगेच्या घाटावर केलेले अस्थिविसर्जनही मला आठवते.”
-
“बेंगलोरवरून ट्रकने गाई आणताना प्रवासात तू आणि मी एकत्र होतो. नागपंचमीला काच लावून मांजा तयार केला, पण पतंग उडवणे आणि काटाकाटी करणे तूच करायचास. बालपण किती भराभर सरले!”
-
“तू मोठा झालास, मंत्री झालास, पण मनात प्रेमाचा हळवा कोपरा तू नेहमी जपलास. रोहित अवघा दोन महिन्यांचा असताना, एवढ्या लहान बाळाला सोबत घेऊन तुझ्या हनिमूनला उटीला जाताना मीच गाडी चालवत होतो. पुढे त्याच रोहितला त्याच्या पहिल्या निवडणुकीत तूच सांभाळून घेतलेस.”
-
“जरी राजकीयदृष्ट्या आपण वेगळे झालो, तरी शेवटच्या काळात तू पुन्हा एकत्र येण्याविषयी आणि सोबत काम करण्याबद्दल नेहमीच जवळीकतेने बोलत होतास.”
-
“कृषिकच्या उद्घाटनाला येऊन आठवणीने तुझ्या वहिनीच्या हातची आवडती भाजी आणि कवट खाऊन नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाचे कौतुक करून गेलास. जे आवडेल ते मनापासून बोलणारा असा तू!”
-
“आज तुझ्या असण्याचा आणि नसण्याचा फरक सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतोय. १९६४ च्या दरम्यान आपले चुलते वसंतदादांच्या अपघाती निधनाने पवार घराणे स्तब्ध झाले होते, काहीशी तशीच भावना आज तुझ्या दूर जाण्याने निर्माण होते. तू सोबत नसलास तरी तू येशील असा भास मात्र सतत होत राहतो.”
-
“मनापासून तुझी आठवण येतेय. तुझे अस्तित्व नेहमी जाणवत राहते… ‘काय बंधू!’ अशा तुझ्या हाकेच्या सादेची मन कायम वाट पाहत राहते.”
-
(सर्व फोटो सौजन्य : राजेंद्र पवार/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक