देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ए.जी. पेरारिवलन याची ३१ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली. पेरारीवलन याची तुरुंगात चांगली वर्तवणूक असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याला तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्याची सुटका झाली आहे. ११ जून १९९१ मध्ये पेरारिवलन याला राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक झाली होती तेव्हा त्याचे वय १९ वर्षे होते.

पेरारिवलन याने सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा दयेचा अर्ज दाखल केला, तेव्हापासून हा खटला बराच काळ प्रलंबित होता. राज्यापासून ते केंद्रापर्यंत आणि राजभवानपासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत ७ वर्षे हा खटला प्रलंबित होता. वयाच्या १९ व्या वर्षी अटक झालेल्या पेरारिवलनचे नशीब सत्तेत येणाऱ्या पक्षांच्या धोरणानुसार बदलत होते. २१ मे १९९१ पासून अनेक विभाग आपल्या पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करत होते आणि नवनवीन गोष्टींवर प्रकाश टाकत होते.

राजीव गांधी यांच्या हत्येच्या मुख्य सुत्रधारांना जिवंत पकडता आले नसताना, १९९८ मध्ये टाडा न्यायालयाने २६ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १९ जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर काही वर्षातच इतर चार जणांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये ए. जी. पेरारिवलन याचा समावेश होता.

या प्रकरणाचा तपास कायम चर्चेत राहिला. राजीव गांधी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर लिहिलेल्या पुस्तकांतील संदर्भांमुळे देखील अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

तपास प्रक्रियेवर उपस्थित झालेले प्रश्न

  • तत्कालीन सीबीआय प्रमुख मारेकऱ्याचा एक महत्त्वाचा व्हिडिओ तपास पथकाकडे देण्यात अपयशी ठरले का? 
  • हत्येसाठी वापरलेल्या टॉय बॅटरी खरेदी करणाऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली ती दबावाखाली घेतलेल्या कबुली जबाबावर आधारित होती का?
  • प्रत्यक्ष बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेची चौकशी का झाली नाही?
  • कार्यक्रमाच्या ठिकाणी मारेकरी आणि एक महिला कॉंग्रेसच्या नेत्या यांच्यात झालेल्या संवादाची चौकशी का झाली नाही? 

ज्यांनी या खटल्याबद्दल लिहिले आहे, त्यामध्ये या प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख डी. आर. कार्तिकेयन, मुख्य तपास अधिकारी के. रागोथमन, बचाव पक्षाचे वकील सी. दोराईस्वामी, तपास प्रक्रियेतील एक पोलीस निरीक्षक पी. मोहनराज आणि पेरारिवलन यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये अनेक आरोप करण्यात आले आहेत.

राजीव गांधींच्या हत्येच्या तपासाबाबत केलेले आरोप…

राजीव गांधी हत्या प्रकरणाचा तपास करताना अनेक राजकारण्यांना वाचवण्यासाठी महत्त्वाचे पुरावे एकतर दाबले गेले किंवा बदलेले गेले.

के रागोथमन, मुख्य तपास अधिकारी

दबावाखाली घेतलेल्या कबुली जबाबाच्या आधारे मला गोवण्यात आले. बॉम्ब कुठे आणि कसा बनवला याचा शोध का घेतला नाही?

ए. जी. पेरारिवलन, आरोपी

मुख्य आरोपी शिवरासन याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने उघड केलेली महत्त्वाची माहिती एसआयटीने दुर्लक्षित केली.

सी. दोराईस्वामी, बचाव पक्षाचे वकील

आता पेरारिवलन याच्या सुटकेनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हा तपास करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.