संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांवर प्रकाश टाकला. तसेच भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरून काँग्रेसवर हल्ला चढवला. यावेळी भाजपाच आगामी निवडणुकांमध्ये निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे :

भाजपा ३७०, तर एनडीएच्या ४०० जागा

सलग तिसऱ्यांदा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात संगितले. देशाला पुढील १००० वर्षांसाठी तयार करायचे आहे असे सांगत ते म्हणाले, “मी देशवासीयांच्या मनात काय आहे याचा अंदाज लावू शकतो. ते निश्चितपणे एनडीएला ४०० पेक्षा जास्त आणि भाजपाला किमान ३७० जागांवर निवडून देतील. यासाठी आता फार काळ शिल्लक नाही. जास्तीत जास्त १००-१२५ दिवस शिल्लक आहेत.” ‘अबकी बार’ मोदींनी आपल्या खासदारांना ‘अब की बार ४०० पार’ म्हटले असल्याचेही त्यांनी संगितले. हे लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने भाजपाने फार पूर्वीच तयारी सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या लोकसभेतील या भाषणामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साहही द्विगुणित झाला आहे.

केंद्रात भाजपाशिवाय पर्याय नाही

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या आजवरच्या कामांवर आणि निर्णयांवर आरोप केले. “अनेक दशके तुम्ही काँग्रेस ट्रेझरी बेंचवर बसला होता, पण आता अनेक दशके तुम्ही तिथे (विरोधी बाकांवर) राहण्याचा संकल्प केला आहे”, असे ते म्हणाले. “लोक तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तिथेच बसवतील. तुम्ही अधिक उंची गाठाल आणि लवकरच सभागृहाच्या सार्वजनिक गॅलरीमध्ये दिसाल”, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली.

पंतप्रधानांनी असेही सांगितले की, विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आता निवडणूक लढण्याचे सामर्थ्य राहिले नाही. यामुळेच काहींना आपल्या जागा बदलायच्या आहेत तर काहींना राज्यसभेद्वारे संसदेत यायचे आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नुकतेच पराभूत झाल्याच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर टीका केली. याचा मुख्य उद्देशही केंद्रात भाजपाशिवाय पर्याय नाही, हा मुद्दा मांडण्याचा होता.

चांगल्या कामांना नाकारणे ही काँग्रेसची संस्कृती

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर चांगले काम नाकारत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, काँग्रेस देशासाठी झालेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे यश नाकारत आहे… आम्ही म्हणतो मेक इन इंडिया, काँग्रेस नाकारतं. आम्ही म्हणतो आत्मनिर्भर भारत, काँग्रेस नाकारतं. आम्ही म्हणतो व्होकल फॉर लोकल, काँग्रेस नाकारतं. आम्ही म्हणतो वंदे भारत ट्रेन, काँग्रेस नाकारतं. आम्ही म्हणतो नवीन संसद भवन, काँग्रेस नाकारतं. मला याबद्दल आश्चर्य वाटतं, कारण ही मोदींनी केलेली कामे नाहीत तर देशाची उपलब्धी आहे.” पंतप्रधानांच्या विधानाचा उद्देश बहुधा विरोधी पक्षाला देशाच्या कामगिरीचा अभिमान नाही, असे दर्शवणे होता.

घराणेशाहीचे राजकारण

गांधी घराण्याला केंद्रस्थानी ठेवून घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा टीका केली. यापूर्वीसुद्धा घराणेशाहीच्या मुद्द्यावर अनेकदा पंतप्रधान मोदींनी भर दिला आहे. घराणेशाहीचे राजकारण, भ्रष्टाचार आणि पक्षाच्या कामांचे अपयश या काँग्रेसच्या भूतकाळातील मुख्य मुद्द्यांना हात घालत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षाच्या दुर्दशेसाठी काँग्रेसला जबाबदार धरले. “तो काळ होता, जेव्हा देशाला रचनात्मक विरोधी पक्षाची गरज होती…, पण काँग्रेस चांगला विरोधी पक्ष होण्यात अपयशी ठरली आहे. इतर पक्षांनाही काँग्रेसने एक होऊ दिले नाही. काँग्रेसने इतर सक्षम नेत्यांना पुढे येऊ दिले नाही. काँग्रेसने स्वतःचे, विरोधी पक्षाचे, संसदेचे आणि देशाचे खूप नुकसान केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या विरोधात युती तयार करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर हा आरोप केला गेला. इंडिया आघाडीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक असणारे नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्यावर आणि टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवरून ही टीका करण्यात आली. भाजपा घराणेशाहीच्या राजकारणात गुंतले असल्याच्या विरोधकांच्या टीकेलाही पंतप्रधानांनी उत्तर दिले. त्यांच्या मते जेव्हा एका पक्षाचे नेतृत्व आणि केवळ एका कुटुंबावर विश्वास असतो, त्याला घराणेशाही म्हणतात. अमित शहा किंवा राजनाथ सिंह दोघांचाही राजकीय पक्ष नाही, असे ते म्हणाले.

यूपीएचे धोरण पक्षाघात

हेही वाचा : दत्तक घेतलेले मूल परत केले जाऊ शकते? नियम काय संगतात?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने भूतकाळात केलेले खड्डे त्यांच्या सरकारने भरले असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. २०१४ मध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणाचा हवाला देऊन त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ज्यात चिदंबरम यांनी म्हटले होते की, देशाचा जीडीपी ३० वर्षांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असेल. यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारच्या विविध योजनांद्वारे साध्य केली गेलेली लक्ष्ये आणि काँग्रेस अंतर्गत ते साध्य करण्यासाठी लागणारा वेळ याची यादी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 important points from pm modi loksabha speech rac
First published on: 06-02-2024 at 16:06 IST