Bihar Assembly Election Results 2025 २०२५ ची बिहार विधानसभा निवडणूक ही गेल्या काही वर्षांतील सर्वांत रंजक निवडणुकांपैकी एक ठरली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडला. यानंतर आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी पार पडत आहे. बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आतापर्यंत समोर आलेल्या कौलमध्ये एनडीएने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. यंदा बिहारमधील मतदानात महिला मतदारांनी ऐतिहासिक कल दर्शविला आणि अनेक मूलभूत घटकांनी मतदारांचा कल निश्चित केला. एनडीएला मोठा फायदा मिळवून देणाऱ्या पाच प्रमुख घटकांवर एक नजर टाकूया.

महिला मतदारांचे विक्रमी मतदान

यावर्षी बिहारमध्ये एकूण ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले, परंतु केवळ महिला मतदारांची उपस्थिती ७१.७८ टक्के होती, जी पुरुषांच्या ६२.९८ टक्के मतदानापेक्षा खूप जास्त आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये, महिलांनी पुरुषांपेक्षा १० ते २० टक्के जास्त मतदान केले. सुपौलमध्ये ही तफावत सर्वाधिक असल्याचे दिसून आले. किशनगंज, मधुबनी, गोपालगंज, अररिया, दरभंगा आणि मधेपुरा येथेही अशीच तफावत नोंदवली गेली. गेल्या जवळपास १५ वर्षांपासून महिला मोठ्या संख्येने मतदान करत आहेत, पण २०२५ हे असे वर्ष ठरले, जेव्हा महिलांच्या विक्रमी सहभागाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

महिलांसाठीची १०,००० रुपयांची योजना ठरली निर्णायक

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमुळे एनडीएला सर्वाधिक फायदा झाला. या योजने अंतर्गत पात्र महिलांना १०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि याच योजनेमुळे एक मोठा पाठिंबा मिळाला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ही योजना विशेषतः महत्त्वाची आहे, कारण २०२२ च्या जातीय सर्वेक्षणानुसार, बिहारमधील ३४ टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबे दरमहा ६,००० किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर उदरनिर्वाह करत आहेत.

गरीब समुदायांमध्ये, विशेषतः अनुसूचित जाती आणि ईबीसी कुटुंबांसाठी, १०,००० रुपयांची एक-वेळची रक्कम एका महिन्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे, त्यामुळे या योजनेकडे केवळ निवडणूक आश्वासन म्हणून न पाहता, खरी मदत म्हणून पाहिले गेले. दैनंदिन खर्चासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबांशी याचा स्पष्ट संबंध जुळला, त्यामुळे अनेक महिला मतदारांना असे जाणवले की, यामुळे त्यांची परिस्थिती त्वरित बदलू शकेल आणि त्यांना स्वावलंबी करू शकेल.

दारूबंदी अजूनही एनडीएसाठी महत्त्वाचा घटक

वर्षानुपूर्वी लागू करण्यात आलेली दारूबंदी, विशेषत: महिलांमध्ये मतदानाच्या वर्तनावर प्रभाव टाकत आहे. अनेक महिलांचा विश्वास आहे की, या बंदीमुळे घरगुती हिंसाचार कमी झाला आहे. यामुळे त्यांच्या घरी पैशांची बचत झाली आहे आणि जीवनशैली सुधारली आहे. बेकायदा दारू विक्री हे अजूनही एक आव्हान असले तरी बंदीची संकल्पना अजूनही एनडीएच्या बाजूने काम करते. मोठ्या संख्येने महिला मतदारांसाठी, सत्ताधारी युतीला पाठिंबा देण्याचे हे एक मोठे कारण राहिले आहे.

मतदार यादीतील वादामुळे वाढली मतदारांची उपस्थिती

मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीने (Special Intensive Revision – SIR) यावर्षी आश्चर्यकारकपणे मोठी भूमिका बजावली. या फेरतपासणीनंतर, मतदार यादीतील लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९०७ महिलांवरून (लोकसभा २०२४) कमी होऊन ८९२ झाले. याचा अर्थ ५.७ लाखांहून अधिक महिलांची नावे वगळण्यात आली. १८ ते २९ वयोगटातील अनेक तरुण महिला ‘कायमस्वरूपी स्थलांतरित’ म्हणून नोंदवण्यात आले. विरोधी पक्षांनी याला ‘मत चोरी’ म्हटले आणि दावा केला की महिलांना अन्यायकारकपणे हटवले जात आहे. मतदारांना परावृत्त करण्याऐवजी या घटनेने त्यांना उत्तेजित केले. अनेक महिलांनी त्यांची नावे पुन्हा तपासली, इतरांनाही ते करण्यास मदत केली आणि त्यांनी आपले मत नक्की नोंदवले याची खात्री केली.

१.८० लाख ‘जीविका दीदीं’नी मतदारांना केले संघटित

१८ ते १९ वयोगटातील १४ लाखांहून अधिक तरुण मतदारांची नावे यादीत जोडली गेली. त्यांच्याकडे कोणताही पूर्वीचा राजकीय अनुभव नव्हता आणि ते पहिल्यांदा मतदान करत होते. निवडणूक आयोगाने हजारो ‘जीविका दीदी’ म्हणजेच महिलांचे एक मोठे नेटवर्क तयार केले. माहिती, बूथ आणि फॉर्म्सच्या बाबतीत लोकांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे काम होते. याचा मोठा परिणाम झाला, विशेषतः महिला आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांवर.

निवडणुकीचा निकाल

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून थोड्या वेळात बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत समोर आलेल्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तसेच तेजस्वी यादव हे पिछाडीवर आहेत. तसेच ओसामा शहाब हे देखील पिछाडीवर आहेत. मतमोजणीत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार जेडीयू-भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे नितीश कुमार यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आणि फटाके फोडत जल्लोष सुरू केला आहे. पक्षाच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्ते पाटणामध्ये कार्यालयाबाहेर जमले असून फटाके फोडत आहेत.