मुंबई : मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या आणि अन्य अधिकाऱ्यांच्या ८२१ मंजूर जागांपैकी ५८७ जागा रिक्त आहेत. ही पदे लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरली जाणार आहेत. मात्र ही पदे भरली जात नाहीत तोपर्यंत ३४७ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत, अशी माहिती नगरविकास मंत्र्यांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांमधील रिक्त जागांबद्दल भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईत चार वैद्यकीय महाविद्यालये असून एक नायर दंतमहाविद्यालय आहे. शेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात ३०८ पदे मंजूर असून ७३ भरलेली आहेत तर २३५ रिक्त आहेत. लोकमान्य टिळक महाविद्यालयात २३० पदे मंजूर असून ७२ भरलेली आहेत तर १५८ रिक्त आहेत.

टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयात १८३ पदे मंजूर असून ५२ भरलेली आहेत, तर १३१ रिक्त आहेत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयात ६८ पदे मंजूर असून १७ भरलेली आहेत, तर ५१ पदे रिक्त आहेत. नायर दंत महाविद्यालयात ३२ पदे मंजूर असून २० भरलेली आहेत, तर १२ पदे रिक्त आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा एकूण ८२१ पदापैकी ५८७ पदे रिक्त आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. नॅशनल मेडिकल कौन्सिलचे नियम दर तीन महिन्यांनी बदलतात.कौन्सिलचे नियम बदलतील त्याचवेळी सरकारचे नियम बदलतील, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी कायदा करावा लागला तरी चालेल, असे पालिका प्रशासनाला सांगण्यात आल्याचे सामंत म्हणाले.