scorecardresearch

Premium

जिलबी विक्रेता ते हॉटेल व्यावसायिक; जेडीयूच्या नेत्याला ‘ईडी’कडून अटक

एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राधा चरण साह यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. साह यांच्यावरील कारवाई राजकीय सूडातून झाली असल्याचा आरोप जेडीयूने केला आहे.

Radha Charan Sah arrest
बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षाचे आमदार राधा चरण साह यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. (Photo – PTI)

जनता दल (युनायटेड) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार राधा चरण साह यांना गुरुवारी (१४ सप्टेंबर) मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. राधा चरण साह यांना बिहारच्या राजकारणात राधा चरण सेठ या नावाने ओळखले जाते. १९७० च्या दशकात जिलबी विकणारे राधा चरण आता बिहारमधील मोठे व्यावसायिक असून त्यांच्याकडे हॉटेल आणि इतर उद्योगधंदे आहेत. बिहारच्या भोजपूर-बक्सर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांची भरभराट झाल्याचे सांगितले जाते. ईडीने बुधवारी रात्री साह यांना ताब्यात घेतले आणि गुरुवारी घरी आणि अराह शहरातील त्यांच्या राईस मिलवर धाडी टाकल्या.

जेडीयू पक्षाचे सरचिटणीस असलेल्या साह यांनी अटकेपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले, “मी व्यवसायासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बिहार ग्रामीण बँक या तीन बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. मला आश्चर्य वाटते, बँकांकडून घेतलेले कर्ज मनी लॉड्रिंग कसे असू शकते?” तर जेडीयू पक्षाने भाजपावर टीका करत सूडबुद्धीचे राजकारण केले असल्याचा आरोप केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी अशाप्रकारची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप पक्षातर्फे करण्यात आला.

kerala high court decision Custody child mother relocating abroad job
परदेशी जाण्याच्या कारणास्तव घटस्फोटित स्त्रीला अपत्याचा ताबा नाकारता येणार नाही
unauthorized hawkers bullied took action against Navi Mumbai Municipal anti-encroachment team
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पथकावरच फेरीवाल्यांची दादागिरी
bombay hc ordered to cbi probe letter Which Claimed Accused Shown Favour
मुंबई : न्यायमूर्ती आरोपीला अनुकूलता दर्शवत असल्याचा पत्राद्वारे दावा; उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
children void, voidable marriages rights to claim parents properties
बेकायदेशीर लग्नांमधून जन्मलेल्या अपत्यांना पालकांच्या मालमत्तेत हक्क!

हे वाचा >> नितीश कुमारांची बदलती भूमिका; जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, कुशवाहा यांच्यासह ११ नेत्यांनी आजवर पक्ष सोडला

जेडीयूचे विधान परिषदेचे आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आरोप केला की, भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापर होतो आहे, हे आता सर्वांनाच माहीत आहे. आम्हाला ईडीकडून जाणून घ्यायचे आहे की, महाराष्ट्रात त्यांनी ज्या नेत्यांवर आरोप केले होते, त्यांच्यावरील कारवाईचे पुढे काय झाले? भाजपाच्या या रणनीतीमागे ‘एक राष्ट्र, एक कायदा’ अशी घोषणा आहे, असे आपण म्हणू शकतो का?

भाजपाचे उपाध्यक्ष संतोष पाठक म्हणाले की, या अटकेमागे कोणतेही राजकीय कारण नाही. भाजपा किंवा केंद्र सरकारचा या विषयात कोणताही हस्तक्षेप नाही. संविधान आणि कायदा यांचे स्थान सर्वात वरचे आहे. जर का कुणी चुकीचे काम करत असेल, तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना स्वच्छ सरकार देण्याची घोषणा केली होती. भ्रष्ट कारवायांमध्ये गुंतलेल्या कुणालाही मोकळे सोडले जाणार नाही. त्यामुळेच राधा चरण साह प्रकरणात सत्ताधारी जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दल यांच्याकडून जे काही आरोप केले जात आहेत, त्याला काहीच अर्थ नाही.

कोण आहेत राधा चरण साह

६५ वर्षीय साह यांच्याकडे हॉटेल, रिसॉर्ट, राईस मिल आणि कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीसारखे अनेक व्यवसाय भोजपूरच्या अराह शहरात आहेत. तसेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतही त्यांनी हॉटेल स्थापित केले आहेत. साह यांनी निवडणुकीसाठी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले, त्यानुसार त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी मिळून ५.५ कोटींची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर शस्त्र कायदा आणि बोगसगिरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

अराहमधील रहिवासी पी. कुमार यांनी सांगितले की, आम्ही लहानपणापासून त्यांच्या कथा ऐकत आलो आहोत. जैन महाविद्यालया (अराह)बाहेर १९७० च्या दशकात जिलबी विकणारा एक माणूस कसा वर्षागणिक मोठा होत गेला. आता त्यांच्याकडे अनेक हॉटेल, रिसॉर्ट आहेत.

हे वाचा >> ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुखपदासाठी रस्सीखेच; लालू प्रसाद यादव यांच्या गुगलीमुळे नितीश कुमार गट अस्वस्थ

साह एकेकाळी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि आरजेडीचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांचे निकटवर्तीय समजले जात होते. प्रभुनाथ सिंह यांच्यावर खूनाचा आरोप सिद्ध झाल्यामुळे ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. साह यांचे व्यावसायिक जाळे वाढत असताना अनेक राजकीय पक्षांनी त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. २०१५ सालच्या विधान परिषद निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांनी त्यांना अराह स्थानिक स्वराज्य संस्थेतून तिकीट दिले होते; मात्र त्यांचा तेव्हा पराभव झाला होता.

त्यानंतर २०२२ साली त्यांनी पुन्हा निवडणुकीत नशीब आजमावले आणि त्यांचा चांगल्या मतांनी विजय झाला. यावर्षी साह यांनी आपला मुलगा कन्हैया याच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त एक मोठा सोहळा आयोजित केला होता, या सोहळ्याला अनेक मातब्बर राजकारणी उपस्थित राहिल्यामुळे साह यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A jalebi seller turned hotelier how jdu mlc who finds himself in ed net in bihar kvg

First published on: 16-09-2023 at 13:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×