मित्रपक्षांवर दबावासाठी पुण्यात राष्ट्रवादीकडून स्वबळाची चाचपणी? | A test of self-strength by NCP in Pune to pressure allies pune muncipal carporation ajit pawar pune | Loksatta

मित्रपक्षांवर दबावासाठी पुण्यात राष्ट्रवादीकडून स्वबळाची चाचपणी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीतही अजित पवार यांची स्वबळाची चाचपणी केल्याचे दिसून येत आहे.

मित्रपक्षांवर दबावासाठी पुण्यात राष्ट्रवादीकडून स्वबळाची चाचपणी?

अविनाश कवठेकर

गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या शहरात पुन्हा बैठका सुरू झाल्या आहेत. शहरातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीतही अजित पवार यांची स्वबळाची चाचपणी केल्याचे दिसून येत आहे. स्वबळाची तयारी ठेवूनच निवडणुकीच्या कामाला लागा, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. मात्र मित्र पक्षांवर दबाव टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळाची भाषा केली जात असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती या मध्यवर्ती भागाबरोबरच हडपसर, वडगावशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची तयारी, प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली.

हेही वाचा : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध

राज्यातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. त्यातच आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) होणार, की चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार, याबाबत राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण आहे. मात्र प्रभागरचना कशीही झाली, तरी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्या दृष्टीने अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडे स्वबळाची चाचपणी केल्याचे दिसत आहे.

मतदारांशी हितगुज करताना आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केवळ आंदोलन करून चालणार नाही, तर जनतेसाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावे लागणार आहेत. निवडणुकांमध्ये आघाडी करण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र, आपण स्व-बळाची तयारी ठेवून निवडणुकीच्या कामाला लागले पाहिजे, असे अजित पवार यांनी बैठकांमधून जाहीर केले आहे. राज्यात मला सर्वाधिक सभासद नोंदणी संख्या पुणे जिल्हा आणि शहराची झालेली हवी आहे. त्यामुळे संघटनेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.

हेही वाचा : इचलकरंजीच्या दूधगंगा पाणी योजनेचा राजकीय प्रवाह सुरूच; कागल आंदोलनाच्या नेतृत्वात बदल लक्षवेधी

बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सत्ताबदलापूर्वीपर्यंत आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीकडून एकत्रित लढविली जाईल, अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर होताच स्वबळाचा नारा दिला होता. प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान १२२ नगरसेवक आगामी निवडणुकीत निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही स्बबळावर निवडणूक लढविण्यासंदर्भातील ठराव मान्य करण्यात आला होता. मात्र आघाडी करण्याबाबतचा किंवा स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. आता अजित पवार यांनीही स्वबळाची चाचपणी केल्याने आणि बैठकांवर जोर दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरच निवडणूक लढवेल, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

हेही वाचा : आदिती तटकरे व तटकरे कुटुंबासह रायगडमधील सर्व पक्षीय नेत्यांचा राजकीय दांडिया

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस-शिवसेनेची आघाडी झाली, तर जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार आहे. आघाडी करताना कमीत कमी जागा काँग्रेस आणि शिवसेनेला देण्यासाठीच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाला आहे. त्यामुळेच स्वबळाची भाषा केली जात आहे, अशी चर्चाही या निमित्ताने होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनगरांमध्ये वर्चस्व आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसला मानणारा वर्ग मध्यवर्ती भागात आहे. उपनगरातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या, तरी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कमी पडणार आहेत. त्यामुळे निवडणूक पूर्व किंवा निवडणुकीनंतर आघाडी करावीच लागेल, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली स्वबळाची भाषा जागा वाटपात मित्रपक्षांवर दबाव टाकण्यासाठी असल्याचीही चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध

संबंधित बातम्या

श्रीशैल्य उटगे : ग्रामीण जनतेचा आवाज
लातूरमधील औशात ग्रामीण मतपेढी बांधणीचा नवा मार्ग, आमदार निधीतून एक हजार किलोमीटरचे शेतरस्ते
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नांदेडचीच निवड का ?
Gujrat Assembly Election : बदलत्या राजकारणात भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती का?
सुप्रिया सुळे यांच्या प. महाराष्ट्र दौऱ्यातही गटतटाचे दर्शन!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुमची लायकी…”, JNU मधील ब्राह्मणविरोधी घोषणांवरून मनोज मुंतशिर-काँग्रेस नेत्यात बाचाबाची; सावरकरांचाही केला उल्लेख
उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा!
सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार
Team India: राहुल द्रविडची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? बीसीसीआयकडून हालचालींना वेग
Himachal Pradesh Election Exit Poll : हिमाचलमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत; सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहण्याची चिन्ह!