दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : बड्या घराण्यातील साखर कारखानदारीतील तीन युवा नेतृत्वाने सहकार पट्टा असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघांमध्ये चाचपणी सुरू केली आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वी राजारामबापू पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी संपर्क वाढवला आहे. उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड व कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू राहुल आवाडे यांचेही नाव पुढे आणले जात आहे. यामुळे बाळासाहेब माने यांचे नातू खासदार धैर्यशील माने यांच्याशी प्रत्यक्ष कोण मुकाबला करणार याची उत्सुकता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. हातकणंगले मतदार संघात चाळीस वर्षांहून अधिक काळ माने, आवाडे व शेट्टी याच तीन घराण्यांचे प्रतिनिधी संसदेत प्रतिनिधित्व करत आले आहे. बाळासाहेब माने यांनी पाच वेळा, त्यांच्या पश्चात कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने व राजू शेट्टी यांनी प्रत्येकी दोनदा तर सध्या या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले खासदार धैर्यशील माने हे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातून निवडणूक लढवण्याचे लढवणार हे निश्चित आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजप व महाविकास आघाडीला रामराम करून लोकसभेची स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: रविकांत तुपकर : लढवय्या शेतकरी नेता

बदलाचे प्रतीक

आता सांगली जिल्ह्यातील नेतृत्व हातकणंगले मतदार संघात उतरत आहे. राजारामबापू साखर समूहाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक यांना आगामी निवडणुकीमध्ये सक्रिय राजकारणात उतरवले जाणार आहे. प्रतीक यांची सांगली जिल्ह्यात पारख सुरू आहे. त्याचा दुसरा भाग म्हणून लोकसभा मतदार संघातही परिस्थिती तपासून पाहिली जात आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा हे जयंत पाटील यांचे प्रभुत्व असलेले आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार असलेले मतदार संघ आहेत. शिवाय, कोल्हापूर जिल्ह्यातील चार मतदार संघांत काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. यामुळे प्रतीक यांच्यासाठी हातकणंगलेचे मैदान पूरक होऊ शकते, असा अंदाज मांडून प्रतीक यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये या मतदार संघातील वेगवेगळ्या गावांना सदिच्छा भेट देण्याचा पाटा सुरू ठेवला आहे. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तेथील समस्या सोडवून घेऊन त्या मार्गी लावण्याचे ते आश्वासन देत आहेत. या वेळी त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कारही केला जात आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वी राजकीय परिस्थिती अनुकूल करण्याची दृष्टीने त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

गायकवाडांना वेध

या मतदार संघात काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनीही मतदार संघात उतरावे असा प्रयत्न सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे एका आंदोलनावेळी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व रणवीरसिंग एकत्र आले होते. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रणवीरसिंग यांना लोकसभेवर निवडून पाठवावे अशी मागणी केली. उदयसिंगराव गायकवाड यांचे पुत्र, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष गायकवाड शाहुवाडी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आता त्यांचे पुत्र रणवीरसिंग हे लोकसभेच्या दृष्टीने संगती लावत आहेत.

हेही वाचा: नागपूर विद्यापीठातील निवडणुकीत काँग्रेसमधील घरभेदी कोण?

भाजपकडून आवाडे तयारीत

हातकणंगले मतदार संघ शिंदे गटाला जाणार असला तरी ऐनवेळी बदल झालाच तर येथे भाजपकडून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू राहुल तयारीत आहेत. हा मतदार संघ भाजपला मिळाला तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांची उमेदवारी राहील, असे यापूर्वीच आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सांगितले होते. मागे एकदा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक राहुल यांनी लोकसभेची चांगलीच तयारी केली होती. ऐनवेळी त्यांना थांबावे लागले होते. १५ वर्षांनंतर त्यांची पुन्हा पडताळणी होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A test youth leadership four major families hatkanangale mp dhairyshil mane pratik patil ranvirsing gaikwad rahul awade loksabha election kolhapur print politics news tmb 01
First published on: 27-11-2022 at 11:01 IST