मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक या दोन मतदारसंघांमध्ये येत्या बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. पदवीधरमध्ये गेली ३० वर्षे असलेले शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. दुसरीकडे हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने सारी यंत्रणा कामाला लावली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होत आहे. मुंबई पदवीधर हा मतदारसंघ पूर्वी भाजपचा बालेकिल्ला होता. पण ३० वर्षांपूर्वी शिवसेनेचे प्रमोद नवलकर यांनी भाजपचे प्रस्थ मोडून काढले. नवलकर आणि डॉ. दीपक सावंत यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गेली सहा वर्षे विलास पोतनीस हे आमदार आहेत. गेली ३० वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेने कायम आपल्या ताब्यात ठेवला आहे. यंदा शिवसेना ठाकरे गटाने अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. परब हे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून येतात. पण या वेळी शिवसेना ठाकरे गटाकडे पुरेशी मते नसल्याने परब यांना पदवीधर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. भाजपने संघ विचारांच्या ‘तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांना उमेदवारी दिली आहे. शेलार यांच्यासाठी भाजपची मुंबईतील सारी यंत्रणा झटत आहे. जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे मोठे आव्हान शिवसेना ठाकरे गट आणि भाजपसमोर असेल. मतदान सुट्टीच्या दिवशी होत नसल्याने सर्वच उमेदवारांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा – ‘आम्ही इथे चुकलो’; केरळमध्ये डाव्यांचं लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन

पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करतो त्याला विजयाची अधिक संधी असते. शिवसेनेने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येक वेळी शाखाशाखांमधील यंत्रणा वापरून मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. याशिवाय स्थानिय लोकाधिकार समितीची यंत्रणाही शिवसेनेला उपयोगी पडते. यंदाही शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. भाजपनेही या मतदारसंघात आधीपासून तयारी केली होती. मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. किरण शेलार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार यांच्यासह पक्षाचे मुंबईतील मंत्री, आमदार या साऱ्यांनी सहभाग घेतला आहे. भाजपने आपले हक्काचे मतदार मतदानासाठी येतील या दृष्टीने नियोजन केले आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात सव्वा लाखांच्या आसपास मतदार आहेत. अखेरच्या टप्प्यात शिवसेनेच्या वतीने नोंदविण्यात आलेली १२ हजार मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत, असा आरोप शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांनी केला. त्याच वेळी भाजपच्या वतीने नोंदविण्यात आलेल्या मतदारांची मात्र नोंदणी करण्यात आल्याची तक्रार परब यांनी केली आहे. भाजपने सारी यंत्रणा कामाला लावल्याने मुंबई पदवीधरमधील निवडणूक यंदा चुरशीची झाली आहे. शिवसेना हा मतदारसंघ कायम राखतो की भाजप शिवसेनेनेचे प्रस्थ मोडून काढते याची उत्सुकता असेल.

हेही वाचा – विधानसभेच्या १० जागांवर रामदास आठवले यांचा दावा

शिक्षकमध्येही चुरस

मुंबई शिक्षकमध्ये लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे मुख्य उमेदवार रिंगणात आहेत. तीन वेळा आमदारकी भूषविल्याने आमदा कपिल पाटील यांनी पुन्हा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेऊन मोरे यांना उमेदवारी दिली. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.

मुंबई पदवीधर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, यंदाही विजय प्राप्त करू. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीत घोळ घातला आहे. हा सारा घोळ कोणाच्या इशाऱ्यावरून झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण विजय शिवसेनेचाच आहे. – अनिल परब, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार

मुंबई पदवीधरमध्ये यंदा चमत्कार होईल. भाजपचा उमेदवार निवडून येईल. – आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष.

शिक्षकांचे प्रश्न कोण सोडवितो हे शिक्षकांना चांगले माहीत आहे. यामुळे राजकीय पक्षांनी कितीही दबाव आणला तरी शिक्षक हे शिक्षक भारतीच्या सुभाष मोरे यांनाच निवडून देतील. – आमदार कपिल पाटील, लोकभारती