आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असेल, असा सनसनाटी दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला… ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही खासदारही फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची मलाही ऑफर आली होती, असे विधान ठाकरे गटातील नेत्याने केले… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने प्रत्युत्तर दिले… काँग्रेस आमदाराला बिश्नोई टोळीकडून सलग दुसऱ्यांदा खंडणीची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरेंच्या दाव्यामुळे भाजपात खळबळ

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एकापाठोपाठ एक दोन राजकीय धक्के बसले. गेल्या महिन्यात सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्यासारखा दिग्गज नेताही अचानक शिंदेसेनेत दाखल झाला. या फोडाफोडीच्या राजकारणामागे एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ असल्याची टीका ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. यादरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनीही एक खळबळजनक दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे अधिवेशन आहे. माझे शब्द लिहून ठेवा, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच फडणवीस हे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात दिसून येतील. शिंदेसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन फडणवीस आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे, असा दावाही आदित्य यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदार आणि विधानपरिषदेच्या एका आमदाराने शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान ठाकरे गटापाठोपाठ आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही खासदारही फुटणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेतील ७ खासदार सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, हे खासदार नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. या संभाव्य फुटीमागे शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा जोरदार चर्चा कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मात्र या चर्चांचे खंडन केले आहे.

वसंत मोरे यांना शिंदेसेनेची ऑफर?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मलाही शिंदे गटाकडून ऑफर आली होती आणि त्याची कल्पना मी खासदार संजय राऊत यांनाही दिली होती, असा दावा ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते वसंत मोरे यांनी केला. पुण्यात माध्यमांशी बोलताना मोरे म्हणाले की, मला दुसऱ्या दिवशी ठाकरे सेनेचे पुण्याचे शहर प्रमुख पद जाहीर होणार होते; पण त्याच्या आदल्या रात्री एका माजी नगरसेवकाने सांगितले की, तात्या तुमची साहेबांनी (एकनाथ शिंदे) आठवण काढली होती. त्यावर तुमच्याकडे एवढे मोठमोठे नेते असताना माझ्यासारक्या कार्यकर्त्याची काय गरज, असा उलट प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर तुमच्याकडे प्रभावशाली सोशल मीडिया आहे, असे त्यांनी मला उत्तर दिले. यादरम्यान फोडाफोडीच्या राजकारणावर वसंत मोरे यांनी टीका केली. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षच नको आहे का? सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष ठेवायचा नाहीये, म्हणजे लोकशाही संपून टाकायची आहे का? आता राज्यकर्त्यांनी हे राजकीय ऑपरेशन थांबवले पाहिजेत आणि राज्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरेंच्या टीकेला शिंदेसेनेचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली होती. महाराष्ट्रात आणि देशात सध्या सुरू असलेले पक्षफोडीचे राजकारण अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे. सत्ता कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही, त्यामुळे आज निर्माण होत असलेली राजकीय पद्धत उद्या सत्ताधाऱ्यांनाच महागात पडू शकते, असे राज म्हणाले होते. प्रश्न नेत्यांना विकत घेणाऱ्यांचा नाही, तर स्वतःला विकायला तयार होणाऱ्यांचा आहे. विकायला तयार असतील तर खरेदी करणारेही तयार असतात, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तुमच्या पक्षात असेल तर वाघ आणि दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या असे स्टेटमेंट करणे गैर आहे, असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. भाजपाची भूमिका काय येत्या काळात ठरेल, असे उत्तरही संजय शिरसाट यांनी दिले.

काँग्रेस आमदाराला बिश्नोई टोळीकडून धमकी

अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई टोळीकडून पुन्हा एकदा धमकी आली. काँग्रेस नगरसेवकाशी फोनवरून संपर्क साधून धमकी ही देण्यात आली आहे. ‘अद्यापही वेळ गेली नाही. लवकर ‘सेटलमेंट’ करा, अन्यथा आता फोन नाही, तर डायरेक्ट गोळी येईल,’ असा इशारा बिश्नोई टोळीच्या गुंडाने दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हा मुद्दा आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार नाना पटोले यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारी २०२६ रोजीही बिश्नोई टोळीच्या गुंडांनी साजिद खान यांना धमकीचा फोन केला होता. ‘‘दोन दिवसांत १० कोटी रुपये दे, अन्यथा तुझा गेम करू, अशी धमकी शुभम लोणकर याने दिली. हा कॉल कॅलिफोर्नियावरून आल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सशस्त्र पोलीस त्यांच्या सुरक्षेत तैनात केले आहेत.