AAP Bihar Election 2025 : दिल्लीच्या सत्तेतून पायउतार व्हावं लागल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने आता आपलं लक्ष बिहारच्या निवडणुकीकडे वळवलं आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजपाला शह देण्यासाठी आणि दिल्लीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी ‘आप’ने राज्यात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी पहिल्यांदाच बिहार विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. मात्र, त्यांनी राज्यातील विरोधकांच्या आघाडीत (राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे महागठबंधन) सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दशकभरापासून दिल्लीची सत्ता उपभोगणाऱ्या आम आदमी पार्टीला यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विशेष बाब म्हणजे, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया तसेच ‘आप’च्या इतर प्रमुख नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. सलग १० वर्ष राजधानीवर वर्चस्व गाजविणाऱ्या ‘आप’ला सत्तेतून बाहेर पडावे लागल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे समोर आली. ती म्हणजे, या निवडणुकीत पक्षाने आपला पारंपरिक मतदार गमावला.
‘आप’च्या दिल्लीतील पराभवाचे कारण काय?
- बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातून आलेल्या आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या स्थलांतरित मतदारांच्या जोरावर ‘आप’ने सलग दोनवेळा राजधानीवर आपलं वर्चस्व ठेवलं होतं.
- स्थलांतरित मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविल्याने ‘आप’ला २०१५ आणि २०२० ची विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं होतं.
- मात्र, अलीकडील निवडणुकीत झोपडपट्टी भागात राहणाऱ्या या स्थलांतरित मतदारांचा कल भारतीय जनता पार्टीकडे झुकलेला दिसून आला.
- यापूर्वी ‘आप’ जिथे जिंकत होती, त्या पाच झोपडपट्टी बहुल मतदारसंघांमध्ये यंदा भाजपाने जवळपास सर्वच जागांवर विजय मिळवला.
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने आपला पारंपारिक मतदार गमावल्याने त्यांना राजधानीतील सत्तेतून बाहेर व्हावं लागलं.

‘आप’चा इंडिया आघाडीपासून दुरावा?
दरम्यान, काँग्रेस व आम आदमी पार्टीने दिल्लीत लोकसभेची निवडणूक एकत्रित लढवली होती. मात्र, राजधानीतील सातही जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवूनही ‘आप’ला राजधानीतील सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आल्याचं पाहायला मिळालं. मागील काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने इंडिया आघाडीपासून दुरावा ठेवल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीतील १६ घटकपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. दुसरीकडे ‘आप’ने मात्र वेगळे पत्र पाठवत स्वतंत्र भूमिका घेतली होती.
आणखी वाचा : लोकसभेतील अपयशानंतर भाजपाने कसं केलं पुनरागमन?
बिहारसाठी आम आदमी पार्टीची रणनीती काय?
दरम्यान, आम आदमी पार्टीने बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, दिल्लीतील मतदारांचा कल बदलल्यामुळे आणि पारंपारिक स्थलांतरित मतदारांवरील पकड निसटल्यामुळे आप आता त्यांच्या मूळ भागात म्हणजेच बिहारमध्ये आपले नशीब आजमविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र, राज्यात आधीपासूनच मजबूत स्थान असलेल्या पक्षांमुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. सध्या तरी ‘आप’ची रणनीती ही स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची दिसत आहे, मात्र आगामी काळात राजकीय समीकरणांनुसार त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘केजरीवाल’ मोहिमेद्वारे ‘आप’चे जनसंपर्क अभियान
आम आदमी पार्टी सध्या “बिहारमध्येही केजरीवाल” या जनजागृती अभियानाद्वारे राज्यातील कार्यकर्त्यांना संघटित करून मतदारांपर्यंत ‘दिल्ली विकास मॉडेल’ पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाने बिहारमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहार राज्याचे ‘आप’ अध्यक्ष राकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली एप्रिलमध्ये सुरू झालेल्या या यात्रेने आतापर्यंत राज्याच्या बहुतांश भागांचा दौरा केला आहे.
याबाबत माहिती देताना बिहारमधील ‘आप’चे प्रभारी अजयेश यादव यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “बिहारमधील जवळजवळ प्रत्येक गावातील लोक दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रांतील ‘आप’ सरकारच्या विकास कार्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. ‘आप’चा पुरवंचल भागात चांगला प्रभाव आहे. फक्त आमच्या पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे, तर सर्वसामान्य जनतादेखील बिहारमध्ये ‘आप’ने निवडणूक लढवावी, असे म्हणत आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी जोरदार तयारी करून राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
बिहारमधील सर्व जागांवर ‘आप’ उमेदवार देणार?
यादव यांनी स्पष्टपणे सांगितले की, राष्ट्रीय जनता दल (RJD) किंवा काँग्रेससोबत युती करण्याचा ‘आप’चा विचार सध्यातरी नाही. ते म्हणाले, “आम आदमी पक्षाची स्वतःची संघटनात्मक ताकद असून पक्षामागे मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्ही बिहारमधील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहोत.” दरम्यान, बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर‘आप’ने स्पष्टपणे एक स्वतंत्र राजकीय पर्याय म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील अनुभव गाठीशी ठेवत आम आदमी पार्टीचे नेते बिहारमध्ये आपली छाप उमटवू पाहत आहेत.
आम आदमी पार्टीचे बिहार प्रभारी अजयेश यादव यांनी असा दावा केलाय की, राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघात पक्षाचे संघटन तयार आहे आणि लवकरच बूथ स्तरावरही संघटन कार्यरत होईल. ‘आप’ने दिल्लीतील पुरवंचली (बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील) मतदारांशी पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली आहे. या मतदारांना आवाहन केले जात आहे की, त्यांनी आपल्या गावी नातेवाईकांना दिल्लीतील आम आदमी पक्ष सरकारने केलेल्या विकासकामांबद्दल सांगावे.
हेही वाचा : पाकिस्तानच्या खोट्या बातम्यांविरोधात लढा कसा दिला, खासदार सुप्रिया सुळेंनी दिली सविस्तर माहिती
‘आप’ दिल्लीतील पराभवाचा बदला घेणार?
याआधी भाजपाने २२ मार्च रोजी, बिहार दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्थलांतरित बिहार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच आम आदमी पार्टीनेही बिहारमध्ये अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अभियानातून दिल्लीतील मद्रासी कॅम्प या झोपडपट्टी भागात झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुद्दा देखील ‘आप’ उचलून धरत आहे. या कारवाईत ज्यांचे घरे उद्ध्वस्त झाली, त्यांपैकी अनेक जण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याचं आप नेत्यांचं म्हणणं आहे. रविवारी ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे पक्षाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी या परिसराला भेट दिली. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण संसदेत उपस्थित केले जाईल आणि या मुद्द्यावर पक्ष पाटण्यात धरणे आंदोलनदेखील करणार आहे.
भाजपाला कोंडीत पकडण्याचा ‘आप’चा प्रयत्न
बिहारमध्ये ‘आप’ने एक नवीन घोषणा वाक्यही (स्लोगन) तयार केलं आहे. “जिन लोगों ने दिल्ली से बिहारियों को भगाया है, उस बीजेपी को बिहार से बिहारी लोग भगाएंगे” (ज्यांनी बिहारी लोकांना दिल्लीमधून हाकलले, त्या भाजपला बिहारमधून बिहारी जनता हाकलून लावेल) या घोषणेच्या माध्यमातून ‘आप’ बिहारमधील जनतेमध्ये भाजपविरोधात नाराजीची भावना जागवण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, आपने सुरू केलेलं हे अभियान पक्षाला आगामी निवडणुकीत किती फायदेशीर ठरणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आम आदमी पार्टी बिहारमध्ये आणखी काय रणनीती आखणार? याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहेत.