अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने दिल्लीनंतर पंजाबमध्ये प्रचंड यश संपादन केलं आहे. यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करायला सुरुवात केली आहे. दिल्ली, पंजाबपाठोपाठ आम आदमी पार्टीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणूक लढवण्याचा इरादा पक्का केला. मात्र, सध्याच्या घडीला ‘आप’ने निवडणुकीआधीच हिमाचल प्रदेशातून माघार घेतल्याचं चित्र आहे. त्यांनी आता केवळ गुजरात राज्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिमाचल प्रदेशच्या तुलनेत गुजरातमध्ये विधानसभेच्या अधिक जागा आहेत. याठिकाणी पक्षाला निवडून येण्याची संधी अधिक असल्याचा समज ‘आप’चा आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे. केजरीवाल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अनेकदा हिमाचल प्रदेशला भेट दिली होती. परंतु आता ते फक्त गुजरातमधील विविध कार्यक्रमांनाच संबोधित करताना दिसत आहेत. १६ ऑक्टोबर रोजीही दिल्लीचे मुख्यमंत्री भावनगर दौऱ्यावर होते.

विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं हिमाचलच्या निवडणुकीची तारीख घोषित केली असून येथे १२ नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडणार आहेत. तर गुजरात निवडणुकीच्या तारखा अद्याप आयोगानं जाहीर केल्या नाहीत. असं असतानाही आम आदमी पार्टीचे बहुतेक मंत्री आणि आमदार गुजरातमध्ये जास्त दिसत आहेत. यामध्ये पंजाबमधील नेत्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका पंजाबी ‘आप’ पदाधिकाऱ्याने सांगितलं की, आमची भाषा पंजाबी असल्याने आम्हाला गुजरातमध्ये भाषेचा व्यत्यय येत आहे, असं असतानाही आम्हाला हिमाचल प्रदेशात का पाठवलं जात नाही? हे एक मोठं कोडं आहे.

२५ जुलै रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एकत्रित हिमाचल प्रदेशातील आभासी रॅलीला संबोधित केलं होतं. यानंतर केजरीवाल पुन्हा हिमाचल प्रदेशात एकदाही फिरकले नाहीत. त्यांनी हिमाचल प्रदेशातील पक्षाच्या युनिटला वाऱ्यावर सोडलं आहे, असंही ‘आप’ नेत्याने सांगितलं. विशेष म्हणजे या वर्षी सुरुवातीला हिमाचल प्रदेशात अरविंद केजरीवालांच्या नावाने मतं मागणारे बॅनर अनेक ठिकाणी लावले होते. यानंतर मार्चमध्ये अरविंद केजरीवालांचे निकटवर्तीय दुर्गेश पाठक यांची राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होते.

हेही वाचा- ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधींचा फिटनेस चर्चेच्या केंद्रस्थानी

दरम्यान, एप्रिलमध्ये केजरीवालांना हिमाचल प्रदेशात पहिला धक्का बसला. ‘आप’चे तत्कालीन राज्य प्रमुख अनुप केसरी यांनी वरिष्ठ नेते आणि सरचिटणीस सतीश ठाकूर आणि इक्बाल सिंग यांच्यासह भाजपात प्रवेश केला. हे पक्षांतर झाल्यानंतर केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंडी येथे ‘तिरंगा यात्रा’ काढली. या घटनाक्रमानंतर पुढच्याच महिन्यात, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली. त्यावेळी, जैन हे हिमाचल प्रदेशातील पक्षाच्या निवडणुकीच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचे नेते होते. असे एकामागून एक धक्के बसल्याने केजरीवाल यांनी निवडणुकीआधीच हिमाचलप्रदेशातून माघार घेतल्याचं चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam adami party in gujarat himachal pradesh assembly election arvind kejriwal rmm
First published on: 18-10-2022 at 23:19 IST