रविवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अहमदाबादमध्ये काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली. केजरीवाल यांनी काँग्रेसचा उल्लेख “फक्त कागदावरचा पक्ष” असा केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना जोरात कामाला लागण्याचे आवाहन करताना म्हटले की काँग्रेसनी कामे केली नाहीत म्हणून त्यांना लोकांनी मते दिली नाहीत. यावेळी ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी अहमदाबादमध्ये पक्षासाठी मनापासून काम करण्याची शपथ घेतली.

केजरीवाल यांच्या विधानावरून हेच स्पष्ट होते की आम आदमी पक्ष गुजरातमध्ये काँग्रेसला आपला प्रमुख विरोधक मानत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने २९ जागा लढवल्या होत्या. पण बहुतांशी मतदार संघात ‘आप’ची अनामत रक्कम जप्त झाली होती. आता २७ वर्षे भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला आपले पाय रोवायचे आहेत. आणि त्यासाठी पहिली पायरी म्हणून राज्यात प्रमुख विरोधी पक्षाची जागा घेण्याचा ‘आप’चा प्रयत्न असणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांनी नुकतीच गुजरातला दिलेली ही भेट गेल्या महिन्यांतील पाचवी भेट आहे. या भेटींमध्ये त्यांनी सदस्यत्व मोहीम, संघटनेची पुनर्बांधणी, कॅडर बेस तयार करणे आणि राज्यसभा खासदाराची नियुक्ती हे विषय अरविंद केजरीवाल यांच्या अजेंड्यावर होते. राजकीय रणनीतीकार संदीप पाठक हे ‘आप’चे गुजरातचे प्रभारी आहेत. रविवारी अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या भाषणातून हेच स्पष्ट होते की ‘आप’च्या सोशल मीडिया टीमच्या टार्गेटवर भाजपा असली तरी गुजरातमध्ये आप आपली संपूर्ण ताकद काँग्रेस विरोधात लावणार आहे.

सुमारे ७००० नवीन पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, केरजीवाल यांनी त्यांना घरोघरी प्रचार करण्यास सांगितले आणि मतदारांना दिल्ली आणि पंजाबमध्ये मोफत वीज आणि मुक्त शिक्षण मॉडेलबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे.  “आम्हाला जनतेला सांगायचे आहे की काँग्रेसला मतदान करून काही उपयोग नाही. मागच्या वेळी तुम्ही काँग्रेसला मत दिलं आणि आता बघा काँग्रेस किती आमदारांनी स्वतःचा पक्ष सोडला. तुम्ही आपले मत वाया घालवू नका. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने एकही मत पडणार नाही याची काळजी आपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे” असे केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.