उत्तर प्रदेशमध्ये नुकतीच लोकसभा पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा आझमगड आणि रामपूर या दोन्ही मतदार संघात पराभव झाला. आझमगड आणि रामपूर हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अखिलेश यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांना समावेश आहे.

पोटनिवडणुकीत झालेल्या अपमानास्पद पराभवासाठी अखिलेश यादव यांना जबाबदार धरले जात आहे. पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे अखिलेश यादव यांनी या दोन्ही मतदार संघात प्रचार न करण्याचा घेतलेला निर्णय असल्याचे बोलले जात आहे.  स्थानिक सपा नेत्यांनी तसेच पक्षाचा मुख्य मित्रपक्ष असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यांनीसुद्धा या पराभवाचे खापर अखिलेश यादव यांच्यावर फोडले आहे. समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाने आझमगडच्चे जिल्हाध्यक्ष हवालदार यादव यांच्याकडून निवडणुकीचा अहवाल मागवला असून त्यांना निवडणुकीच्या निकालाचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. परंतु त्यांनी रामपूरचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र गोयल यांच्याकडून असा कोणताही अहवाल मागितला नाही. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की “सर्वांना रामपूरमधील पराभवाची कारणे माहित असल्याने अहवाल तयार करण्याची गरज नाही”.

बसपाने रामपूर मतदार संघात उमेदवार उभा केला नव्हता. आझमगडमध्ये बसपाचा उमेदवार असूनही मायावती या मतदार संघात प्रचारासाठी गेल्या नव्हत्या. मात्र तरीसुद्धा बसपाच्या उमेदवाराने या निवडणुकीत चांगली मुसंडी मारली होती. याबाबत बोलताना बसपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “जरी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मायावती आझमगढला गेल्या नसल्या तरी २३ जूनच्या मतदानाच्या काही दिवस आधी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले होते.या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदारांना, विशेषतः दलित आणि मुस्लिमांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते”.

आझमगढ आणि रामपूर या दोन्ही मतदार संघात समाजवादी पक्षाने त्यांच्या नेत्यांना प्रत्येक मतदारसंघात किमान एक जाहीर सभा घेण्याचे आदेश दिले होते. मात्र संबोधित सपा नेते प्रमुख प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत. विशेषत: आझमगढ त्यांचा स्वतःचा मतदारसंघ असूनही त्यांनी प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले. आझमगडमधून पक्षाने अखिलेश यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. स्थानिक नेत्यांना अखिलेश आझगडमध्ये प्रचारसभा घेतील अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. प्रत्यक्ष प्रचार सोडा, अखिलेश यांनी आपल्या मतदारांना मायावतींसारखे आवाहनही केले नाही याबाबत पक्षाच्या नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतांचे विभाजन करून भाजपाने त्यांचे उमेदवार दिनेश लाल यादव म्हणजेच लोकप्रिय भोजपुरी अभिनेते-गायक निरहुआ यांना निवडून आणले.