तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राजकीय जाणकारांचे सर्व अंदाज मोडीत काढले. जेमतेम दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाने यंदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करीत १०० हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली. मात्र, हा पक्ष स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणार की थोडक्यात मागे राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विजय यांच्या पक्षाला बहुमतासाठी काही जागांची गरज भासल्यास राज्यातील अनेक छोटे आणि प्रादेशिक पक्ष त्यांच्यासोबत हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे समजते, यादरम्यान विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला केलेले आवाहन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे, त्याविषयी…

तमिळनाडूत कोणत्या पक्षाला किती जागा?

तमिळनाडूत गेल्या अनेक दशकांपासून द्रमुक किंवा अण्णा द्रमुक या दोन द्रविडी पक्षांपैकी एकाची स्पष्ट बहुमताने सत्ता येते. यंदा मात्र अभिनेता विजय यांनी ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर तिसरा पर्याय ठेवला होता. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत विजय यांच्या पक्षाला राज्यातील मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्याचेच प्रतिबिंब यावेळच्या निवडणुकीच्या निकालांमधून दिसून आले. निवडणूक आयोगाने सायंकाळी सात वाजेपर्यंत जारी केलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील २३४ जागांपैकी तब्बल १०९ जागांवर ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाने आघाडी मिळवली होती. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्ष ७४ जागांवर आघाडीवर होता, तर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी केवळ ५२ जागांवरच आघाडीवर असल्याचे दिसून आले.

तमिळनाडूत बहुमताचा आकडा किती?

२३४ जागा असलेल्या तमिळनाडूच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. मात्र, सध्याचे कल पाहता राज्यात तिरंगी लढत दिसत असून, कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुकप्रणित आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून राज्यात १० वर्षांनंतर सत्ता स्थापन केली होती, तर त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकला केवळ ६६ जागांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीनंतर एम. के. स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यंदा मात्र विजय यांच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णा द्रमुकला धक्का देत विधानसभेच्या १०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली. जर हा पक्ष बहुमताच्या आकड्यापासून (११८ जागा) थोडक्यात मागे राहिला, तर राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरू शकते.

काँग्रेसची भूमिका ठरणार निर्णायक?

काँग्रेसने यापूर्वीच ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाला आपला ‘नैसर्गिक मित्रपक्ष’ म्हणून संबोधले होते, तसेच राहुल गांधी यांनीही विजय यांच्याशी युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. त्यामुळे विजय यांना सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत लागल्यास त्यांना काँग्रेसचा निश्चितच पाठिंबा मिळू शकतो. मतमोजणीची आकडेवारी पाहिल्यास राज्यात काँग्रेसचे जवळपास पाच ते सहा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय डाव्या पक्षांना (सीपीआय आणि सीपीआय-एम) दोनपेक्षा अधिक मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत, विजय यांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असून, त्यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे सत्ता स्थापनेचा दावा कधी केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विजय यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेस पक्षाला एक आवाहन केले आहे. ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाबरोबर युती करून काँग्रेसने राज्यात आपली गेलेली राजकीय ताकद पुन्हा मिळवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर यांचे काँग्रेसला युतीचे आवाहन

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर थेट भाष्य केले. “काँग्रेसचा मोठा राजकीय इतिहास असतानाही आज पक्ष आज कमकुवत का होत आहे? कारण, त्यांच्याकडे सत्ता नाही. सध्या काँग्रेस दुसऱ्या पक्षांना पाठिंबा देऊन स्वतःचे अस्तित्व कमी करत आहे. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, गेलेली सत्ता विजय तुम्हाला मिळवून देऊ शकतो. जर काँग्रेसला आपला इतिहास आणि ओळख जपायची असेल, तर त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि विजयला पाठिंबा द्यावा,” असे आवाहन चंद्रशेखर यांनी केले आहे. जनतेने विजयला केवळ एक चित्रपट अभिनेता म्हणून नाही, तर एक खंबीर नेता म्हणून स्वीकारले आहे. प्रस्थापित पक्षांविरुद्धचा लोकांचा संताप आणि बदलाची ओढ यामुळेच ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाला हे यश मिळाले आहे. विशेषतः तरुण आणि महिला मतदारांनी ‘अण्णा’ (विजय) यांच्यावर दाखवलेला विश्वास हा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विजय यांनी मतदारांना काय आश्वासन दिले?

२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘तमिलगा वेत्री कळघम’ पक्षाची स्थापना केल्यानंतर अभिनेता विजय यांनी विल्लुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे आपल्या पक्षाची पहिली सभा घेतली होती. या सभेला सुमारे तीन लाख लोक जमले होते. पहिल्याच सभेत त्यांनी आपली राजकीय विचारधारा, आपण कोणाविरोधात लढणार आहोत, हे स्पष्ट केले होते. भाजपाप्रणीत केंद्र सरकार आणि द्रमुकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर टीका करताना आपला पक्ष जातीविरोधी, धर्मनिरपेक्ष विचारधारा राखणारा असेल, हे विजय यांनी स्पष्ट केले. द्रविडम आणि राष्ट्रवाद हे आपल्या विचारधारेचे दोन महत्त्वाचे पैलू असल्याचेही त्यांनी या सभेत सांगितले होते. तसेच तमिळनाडूचे महापुरुष पेरीयार यांचा देव-देवतांच्या विरोधातला विचार सोडून इतर द्रविडम विचारसरणी स्वीकारत असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळणार?

स्वातंत्र्यानंतर १९५२ ते १९६७ या काळात तमिळनाडूत काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते के. कामराज यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व होते. त्यानंतर १९६७ च्या निवडणुकीत राज्यात सी. एन. अन्नादुराई यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. १० वर्षांनी एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी द्रमुकमधून बाहेर पडून अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून राज्यात या दोनच पक्षाची आलटून पालटून सत्ता येत आहे. १९६७ ते २०२१ पर्यंत द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रमुख पक्षांनी राज्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळवले. या काळात एमजीआर, एम. करुणानिधी, जे. जयललिता, ओ. पन्नीरसेल्वम आणि एम. के. स्टॅलिन या नेत्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. यादरम्यान, यंदाच्या त्रिशंकू विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूतील जनतेने विजय यांच्या पक्षावर विश्वास दाखवला आहे. मात्र, त्यांना बहुमतासाठी काही जागा कमी पडण्याची शक्यता असल्याने सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विजय यांच्या वडिलांच्या या आवाहनानंतर काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार आणि तमिळनाडूमध्ये नवीन राजकीय समीकरणे जुळणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.