अधीर चौधरी हे एकेकाळी पश्चिम बंगालमधील सर्वात प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक होते. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहामपूर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता. पूर्वी या भागात त्यांच्या शब्द अंतिम मानला जायचा. मात्र आता अधीर चौधरी यांची ताकत कमी होत चालली आहे की काय ? असा प्रश्न निर्माण होतोय. अधीर चौधरी यांनी मुर्शिदाबाद विद्यापीठाचे नाव बदलून राजा कृष्णाथ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. राजा कृष्णाथ हे मुर्शिदाबादच्या इतिहासातील एक प्रमुख व्यक्ती आहेत. सध्याची चौधरी यांची भूमिका बघता आगामी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भवितव्याबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केली जात आहे.

अधीर चौधरी हे प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत. तसेच लोकसभेतील पक्षाचे नेतेही आहेत. ते १९९९ पासून बेरहामपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. बेहरामपूर हा मतदार संघ १९५२ पासून रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी ( आरएसपी) चा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र हळूहळू त्यांची ताकत कमी होत गेली. या मतदार संघातून अधीर चौधरी यांनी १९९९ साली पहिल्यांदा विजय मिळवला.या मतदारसंघातून त्यांचा हा  विजय आश्चर्यकारक मानला जात होता कारण या जागेवर १९५२ पासून आरएसपीची मजबूत पकड होती. पश्चिम बंगालमधील इतर भागांमध्ये तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व असतानाही २०१६  च्या विधानसभा निवडणुकीत बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व सात विधानसभा क्षेत्रांत काँग्रेसने विजय मिळवला होता. या निकालावरून अधीर चौधरी यांची मतदार संघावर असलेली मजबूत पकड स्पष्ट होते.  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चौधरी यांनी ८०,००० मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदार संघात तृणमूल आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना आपल्या बालेकिल्ल्यात प्रवेश करू दिला नाही. मुर्शिदाबाद जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या मुस्लिम समुदायाच्या पाठिंब्यानेच चौधरी यांनी या मतदार संघ राखला आहे.

२०१६ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व सात जागा जिंकणाऱ्या चौधरी यांना गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातील सातही विधानसभा मतदारसंघ गमावले. पक्षाला मुर्शिदाबाद जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही. यामध्ये काँग्रेसची घट्ट पकड असलेली हक्काची असणारी अल्पसंख्याक समाजातील मतांची टक्केवारी घसरली. सीमावर्ती जिल्ह्यातील वाढत्या ध्रुवीकरणामुळे भाजपाला यश मिळाले. राजकीय निरीक्षक आणि पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांची भूमिका ही त्यांची राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड आहे.