scorecardresearch

Premium

गुलाबराव पाटील, दादा भुसेंविरोधात आदित्य ठाकरेंच्या आक्रमकतेला अधिक धार

शिंदे गटात गेलेल्यांविरोधात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे अधिक आक्रमक झाल्याचे उत्तर महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रेत दिसून आले आहे.

Aditya Thackeray Sattakaran (1)

अविनाश पाटील

शिवसेनेने मंत्रिपद दिलेले असतानाही आणि कायम एकनिष्ठ राहण्याची ग्वाही देणाऱ्यांनीही शिंदे गटाला साथ दिल्यामुळे इतर बंडखोर आमदारांपेक्षा मंत्री असूनही शिंदे गटात गेलेल्यांविरोधात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे अधिक आक्रमक झाल्याचे उत्तर महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रेत दिसून आले. त्यामुळेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि बंदरे, खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जाहीर सभांमध्ये त्यांचा सूर अधिक टिपेला लागला होता.

Dhangar community aggressive against Radhakrishna Vikhe
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात धनगर समाज आक्रमक
Chandrashekhar Bawankule (2)
“पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी…”, भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…
email
लोकमानस : राजकारण लांडग्यांचा खेळ झाला आहे का?
Sanjay Raut on Eknath Shinde rebel MLA
“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

प्रकृति व्यवस्थित नसल्याने नऊ ऑगस्ट अर्थात क्रांतिदिनी होणारा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात त्याविषयी विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना गुलाबराव पाटील यांनी दिलेले उत्तर, मतदारसंघात असलेला गुलाबरावांचा दरारा, यामुळेच आदित्य यांनी ऐनवेळी दौरा रद्द केल्याची चर्चा रंगली होती. परंतु, शनिवारी आदित्य यांनी जळगाव, धुळेसह नाशिक जिल्ह्यातील मालेगावचाही दौरा तर केलाच, शिवाय गुलाबरावांसह दादा भुसे यांचा समाचारही घेतला. जळगाव विमानतळावर आदित्य यांचे महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने आदी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केल्यावर आपण या दौऱ्यात गद्दारांचा बुरखा फाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदित्य यांच्या स्वागतासाठी धरणगाव या गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात लावण्यात आलेले फलक रात्रीतून फाडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, आदित्य यांनी हे विधान केले. या कृत्याविषयी सर्वांना आपलाच संशय येईल, हे लक्षात घेऊन शिंदे गटाने त्वरित फलक फाडल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.

जळगाव विमानतळावरून निघालेल्या आदित्य यांचे पाचोऱ्याला जाईपर्यंत ठिकठिकाणी जोरदार स्वागत झाले. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची जवळीक दिवसेंदिवस कशी वाढत आहे, त्याचे दर्शनही या दौऱ्यात झाले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदित्य यांचे झालेले स्वागत त्याचेच प्रतिक म्हणावे लागेल. या स्वागतास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पाचोरा येथील सभास्थळी विविध घोषणांसह वैशालीताई आगे बढो, या घोषणेने आदित्य यांचे लक्ष वेधून घेतले. वैशाली सूर्यवंशी बंडखोर आमदार किशोर पाटील यांची बहीण आहे. पाचोऱ्याचे शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत आर. ओ. पाटील हे किशोर पाटील यांचे काका. वैशाली या आर. ओ. पाटील यांच्या कन्या. किशोर पाटील यांनी शिंदे गटाला साथ दिल्याने वैशालीताई यांनी मातोश्रीशी निष्ठा दाखवित एकप्रकारे भावालाच आव्हान दिले आहे. त्यामुळेच या सभेत आदित्य यांनीही वैशालीताईंसाठी पुन्हा येथे यावेच लागणार आहे, असे जाहीर करीत एकप्रकारे वैशालीताई या पुढील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार राहतील, असे सूचित केले.

पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव या दौऱ्यात आदित्य यांनी प्रामुख्याने बंडखोरांवर टीकास्त्र सोडले असले तरी गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांना अधिक लक्ष्य केले. ज्यांच्यावर अधिक विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिल्याचा आरोप केला. मालेगावात नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने रात्री त्यांची सभा होऊनही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. बंदरे, खनिकर्म मंत्री भुसे यांना कृषीपेक्षा दुय्यम खाते मिळाल्याचे भुसे यांचे नाव न घेता लक्षात आणून देत त्यांच्या प्रचारासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून गद्दारी करून काय मिळाले, असा प्रश्न केला. शिंदे गटातील बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन थेट त्यांना आव्हान देणाऱ्या आदित्य यांना मिळालेला प्रतिसाद स्थानिक शिवसैनिकांचा हुरूप वाढविणारा ठरला. 


Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aditya thackeray got more aggressive against gulabrao patil and dada bhuse print politics news pkd

First published on: 21-08-2022 at 20:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×