महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडी : कदाचित देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने दिल्लीत खेचून कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल, असा सनसनाटी दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला… शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली… करोना काळात ‘मंदिरे उघडा’ अशी मागणी करणाऱ्यांना आज स्वतःहून मंदिरे बंद करण्याची वेळ आल्याची टीका आमदार अंबादास दानवे यांनी केली… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणात वापरलेल्या शब्दांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला… यंदा प्रथमच मुंबई ठाकरेंमुळे नाही तर पावसामुळे तुंबली, असा सणसणीत टोला आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी महायुतीला लगावला… आज दिवसभरात घडलेल्या या ५ महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

“फडणवीसांना दिल्लीत खेचलं जाईल”

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधीमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत दोन तास भाषण केले आणि त्यात खूप थापा मारल्या, अशी टीका आदित्य यांनी केली. त्यांच्या भाषणातून फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होते. बऱ्याचदा अहंकार हेच नैराश्याचे लक्षण असते. मी याआधीही सांगितले आहे की, मुख्यमंत्री म्हणून हे त्यांचे कदाचित शेवटचे अधिवेशन असू शकते. फडणवीसांना बळजबरीने दिल्लीत खेचून केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल, असा दावाही त्यांनी केला. विरोधी पक्षाने विचारलेले प्रश्न तुम्हाला एवढे झोंबत असतील, तर मग तुम्ही त्या खुर्चीवर बसलाच कशाला? तुम्ही ज्या सत्तेच्या खुर्चीवर बसला आहात, तिथे लोक तुम्हाला प्रश्न करणारच. जर भ्रष्टाचार केला असेल, पैसा खाल्ला असेल तर, टीकाही सहन करावी लागेल, असेही आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ खडसे भाजपात परतणार?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खडसे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले. या भेटीमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या शक्यता निर्माण झाली असतानाच शरद पवार गटानेही सावध पावले उचलण्यास सुरुवात केली. खडसे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पक्षात कायम ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडून सध्या संघटनात्मक स्तरावर महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे दिसून येते. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांची भाजपातील संभाव्य घरवापसीच्या निर्णयाचा परिणाम केवळ त्यांच्या वैयक्तिक राजकीय वाटचालीपुरता मर्यादित राहणार नाही, तर जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवरही होऊ शकतो. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने वेळ न दवडता खडसे यांची नाराजी दूर करण्याबरोबरच त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांनाही संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

अंबादास दानवे यांची महायुतीवर टीका

करोना काळात ‘मंदिरे उघडा’ अशी मागणी करणाऱ्यांना आज स्वतःहून मंदिरे बंद करण्याची वेळ आल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दानवे म्हणाले की, करोना संकटकाळात जेव्हा संपूर्ण जग ठप्प झाले होते, तेव्हा याच भाजपाच्या काही लोकांनी ‘मंदिरे उघडा’ अशी मागणी करणारी पत्रे राज्यपालांना दिली होती. राज्यपालांच्या घराचे उंबरठे झिजवून त्यांनी मंदिरे उघडण्यासाठी प्रचंड आग्रह धरला होता. आता मात्र, निसर्गाची आणि वरुणराजाची चक्री अशी काही फिरली आहे की, त्याच मंडळींवर आज स्वतःहून मंदिरे, पर्यटनस्थळे आणि गावांमध्ये लोकांना ‘नो एन्ट्री’ घोषित करण्याची वेळ आली आहे. या बदललेल्या भूमिकेवरून आणि घेतलेल्या ‘यु-टर्न’वरून जर सत्ताधाऱ्यांवर टीका झाली, तर ती मुख्यमंत्री महोदयांना सहन होत नाही, असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंचा फडणवीसांवर संताप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणात वापरलेल्या शब्दांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजपा सत्तेचा अमरपट्टा घेऊन आले नाही. उद्या जेव्हा तुम्ही विरोधात बसाल तेव्हा तुम्हीही राजकारण करू नका. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बघून घेऊ ही भाषा कुठून आली? खासदार बॉम्ब फोडण्याची भाषा करतात. कुणाचाही अंकुश नाही. दुसरे बोलायला लागले तेव्हा त्रास व्हायला लागला. मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत भाषण मला कळलं नाही. मिसिंग लिंकचं राजकारण करत असेल तर आम्ही बघून घेऊ…मुख्यमंत्री आहात ना…बघून घेऊ…ही भाषा कसली? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. राम मंदिराबाबत प्रत्येक हिंदुला आस्था आहे. तिथल्या चोरीवर बोलले तर धर्माचा अपमान कसा? राम मंदिरात श्रद्धेने लोक दानपेटीत काही गोष्टी टाकतात, त्याची चोरी होत असेल तर त्याबाबत बोलायचे नाही का? असा सवालही ठाकरे यांनी मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यातून उपस्थित केला.

भास्कर जाधव यांचा महायुतीला टोला

यंदा प्रथमच मुंबई ठाकरेंमुळे नाही तर पावसामुळे तुंबली, असा सणसणीत टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी महायुतीतील नेत्यांना लगावला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव म्हणाले की, मी पावसाचे आभार मानतो. कारण, आजपर्यंत मुंबई ठाकरेंमुळे तुंबत होती. मुंबईत ठाकरेंमुळे पाणी साचत होते. मुंबईतील रस्त्यांवर खड्डे ठाकरेंमुळे पडत होते. पण, यंदा प्रथमच मुंबई ठाककरेंमुळे नाही तर पावसामुळे तुंबली आहे. एक महिना उशिराने आलेल्या पावसाने मुंबई तुंबली. झाडे पडून लोकांचा मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये पडून लोकांचा मृत्यू झाला; पण हे मुंबईत पहिल्यांदाच ठाकरे यांच्यामुळे नाही तर पावसामुळे घडत आहे. मिसिंग लिंकला २७० किलोमीटर प्रति तास वारा आला तरीसुद्धा धक्का लागणार नाही, असा दावा करण्यात आला. आता पहिल्याच पावसात मिसिंग लिंकला गळती लागली. आता सरकार सांगत आहे, मिसिंग लिंकला काहीच झाले नाही. पण, जे झाले ते सर्व लोकांनी बघितला आहे, त्यामुळे लोकं त्यावर विश्वास ठेवणार नाही, असेही जाधव म्हणाले.