मुंबई : राज्य सरकारचे धोरण हे उद्याोगांना मारक आहे. उद्योगांना व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या सरकारकडून गेल्या अडीच वर्षात एकदाही ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या औद्याोगिक परिषदेचे आयोजन करण्यात आलेले नाही. राज्यात येणारे उद्योग अन्य राज्यात जात असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धोरणाचा फटका या उद्योगांना बसत आहे. ‘मर्सिडीज बेंझ’सारख्या कंपनीची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अचानक करण्यात आलेल्या तपासणीमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवरच परिणाम होण्याची भीती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’द्वारे व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>> भाजपशी युतीच्या चर्चांमुळे अब्दुल्लांच्या अडचणींमध्ये भर
राज्य सरकारच्या उद्योग धोरणावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी तीन बाबींवर आक्षेप नोंदविला. सरकारच्या राजवटीच्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन करण्यात आले नाही. एकदा तर ‘व्हायब्रंट गुजरात’साठी आयोजन रद्द करण्यात आले. एकीकडे तमिळनाडूसारख्या राज्याकडून महाराष्ट्रात अशा प्रकारची परिषद आयोजित करून आपल्याकडे येणारी गुंतवणूक खेचली जात असताना, राज्यात मात्र गुंतवणूक परिषदेचे आयोजन का केले जात नाही, असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुणे दौऱ्यादरम्यान ‘मर्सिडीज बेंझ’ कंपनीला भेट दिली होती. त्यावेळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत आक्षेप नोंदवत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. मोठे उद्याोग परराज्यात जात असताना प्रदूषण मंडळाकडून मर्सिडीज बेंझ कंपनीच्या अचानक करण्यात आलेल्या तपासणीमुळे उद्योगजगतात चुकीचा संदेश गेला आहे. मुळात या मंडळाचे अध्यक्ष कायदेशीर आहेत का? ती भेट होती की छापा? या प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. ‘मर्सिडीज’ कंपनी ने नेमके काय उल्लंघन केले, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिले असून उत्तराची प्रतीक्षा आहे. प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षांचा अहंकार जपण्यासाठी उद्याोग राज्याबाहेर घालवायचे का? आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून अशी गुंडगिरी खपवून घेतली जाईल का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून करण्यात आलेल्या मर्सिडीज कंपनीच्या तपासणीसंदर्भात होणाऱ्या टीकेबाबत अध्यक्ष सिद्धेश कदम यांना विचारले असता आपल्याला काम करायचे आहे, अशा टीकेला उत्तर द्यायला वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले