ठाकरेंना 'हिरे' गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता | advay hire joined hands with Uddhav thackeray , Shiv Sena got option in Dhule | Loksatta

ठाकरेंना ‘हिरे’ गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता

नाशिकचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने हिरेंना देऊ केलेल्या विशेष महत्वामुळे भुसेंच्या राजकीय अडचणी वाढवू शकतात अशी चिन्हे आहेत.

Advay hire, Uddhav Thackeray , Shiv Sena, Dhule, Malegaon
ठाकरेंना 'हिरे' गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता

प्रल्हाद बोरसे

मालेगाव : भाजपचा त्याग करुन शिवसेना ठाकरे गटात दाखल झालेले मालेगावमधील अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशाची खुद्द पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अभूतपूर्व म्हणून केलेली संबोधना आणि हिरे यांनी शिवसेनेतर्फे अवघ्या उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करावे म्हणून दिलेल्या प्रस्तावामुळे हिरे समर्थकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने हिरेंना देऊ केलेल्या विशेष महत्वामुळे भुसेंच्या राजकीय अडचणी वाढवू शकतात अशी चिन्हे आहेत. त्यामुळे प्रारंभी हिरे यांचे पक्षांतर हलक्यात घेणाऱ्या शिंदे गटात आता काहीशी अस्वस्थता जाणवू लागल्याचे दिसत आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्याने राज्यातील उध्दव ठाकरे यांचे सरकार गडगडले होते. त्यानंतर बंडखोरांनी भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. बंडखोरांनी शिवसेना पक्षावरही दावा ठोकल्याने मोठा वाद उत्पन्न झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेनेचे उध्दव ठाकरे व शिंदे गट असे दोन पक्ष अस्तित्वात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व ४० बंडखोरांना येत्या निवडणुकीत ‘कात्रजचा घाट’ दाखविण्याची ठाकरे गटाची योजना आहे. या बंडखोरा़ंमध्ये नाशिकचे पालकमंत्री व मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे आमदार दादा भुसे यांचा समावेश आहे.

हेही वाचा… मुंबईत भाजपची मदार मोदींवरच

मालेगावमध्ये भुसे यांना शह देण्यासाठी पर्याय शोधण्याचे गेली काही दिवस ठाकरे गटाचे प्रयत्न जारी होते. त्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती व एकेकाळी भुसे यांचे उजवे हात समजले जाणारे बंडू बच्छाव यांना गळ घालण्याचे प्रयत्न केले गेले. बच्छाव हे गेली दोन वर्षे भुसे यांचेपासून दुरावलेले आहेत. वास्तविक त्यांनी शिवसेना सोडलेली नाही, पण ते पक्षात सक्रियही नाहीत. ते सक्रिय झाल्यास त्यांच्या रूपाने भुसे यांना तगडा पर्याय उपलब्ध होईल, असा ठाकरे गटाचा कयास होता. मात्र बच्छाव यांची भूमिका तळ्यात-मळ्यात राहिल्याने ठाकरे गटाला दुसरा पर्याय शोधण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यानुसार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांना भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात आणण्याची मोहीम फत्ते केली. हिरे व त्यांच्या समर्थकांच्या मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे गटातर्फे मोठा गाजावाजा केला गेला. राज्यभरातील ४० बंडखोरांना सक्षम पर्याय देण्याची मोहीम सुरु झाली व त्याचा श्रीगणेशा हिरेंच्या पक्ष प्रवेशाने झाल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न ठाकरे गटातर्फे यावेळी केला गेला.

हेही वाचा… कसब्यात उमेदवारीवरून भाजपमध्येच चुरस

हिरे हे कुळकायद्याचे जनक व माजी महसूलमंत्री कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे पणतू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात हिरे घराण्याचा प्रदीर्घ काळ दबदबा होता. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे या नवख्या उमेदवाराने अद्वय यांचे पिताश्री व तत्कालीन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांना धूळ चारत हिरे घराण्याची सत्ता घालवली. तेव्हापासून सतत चारदा निवडणूक जिंकणाऱ्या भुसे यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला. या सर्व काळात मतदार संघातील पकड उत्तरोत्तर घट्ट करत आपले साम्राज्य निर्माण करण्यात भुसे हे यशस्वी झाले आहेत. शिंदे गटात गेलेल्या भुसेंसारख्या असामीला टक्कर देण्यासाठी मोठा राजकीय वारसा लाभलेल्या अद्वय हिरेंसारख्या युवा नेत्याची ठाकरे गटाला गरज होती. त्यानुसार हिरेंना प्रवेश देताना त्यांचे महत्व कसे वाढेल, यावर ठाकरे गटाचा भर असल्याचे दिसत आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी ‘बरे झाले गद्दार गेले, म्हणून हिरे गवसले’ असे विधान करुन उध्दव ठाकरे यांनी त्यासंदर्भातील आपला इरादा स्पष्ट केला आहे. अद्वय हिरे हे आगामी विधानसभा निवडणुकीत भुसेंच्या विरोधातले उमेदवार असतील आणि केवळ मालेगावचेच नव्हे तर, त्यांनी उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करावे,असा प्रस्तावही ठाकरेंनी त्यांना देऊन टाकला.

हेही वाचा… Maharashtra News Live : “पुरक वातावरण नसल्यानेच भारतात उद्योग आले नाहीत”; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

गेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघात भुसेंना पराभूत करणे, या एकमेव हेतुने एकत्र आलेल्या विरोधकांतर्फे काँग्रेसचे डाॅ. तुषार शेवाळे यांनी उमेदवारी केली होती. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अद्वय यांनी स्वत: माघार घेतली. त्यावेळी सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतर रंगतदार वळणावर जात असल्याचे दृश्य दिसू लागले होते. मात्र शेवटच्या चरणात डाॅ. शेवाळे यांची प्रचार यंत्रणा अचानक थंडावली. जणू ही निवडणूक त्यांनी सोडून दिली की काय असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला होता. अशाही वातावरणात डाॅ. शेवाळे यांनी जवळपास पाऊण लाख मतांचा टप्पा गाठला होता. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही यंत्रणा उभी केली गेली नसताना डाॅ. शेवाळे यांना अपेक्षेपेक्षा बरीच जादा मते पडल्याने तेव्हा अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. गेल्यावेळचा हा अनुभव लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटातर्फे हिरे रिंगणात असले आणि काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस अशा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची त्यांना साथ लाभली तर भुसेंचा निवडणूक मार्ग खडतर बनू शकतो, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाकरेंना ‘हिरे’ गवसणे हे शिंदे गटाची चिंता वाढविणारे असेच म्हणावे लागेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:06 IST
Next Story
मुंबईत भाजपची मदार मोदींवरच