scorecardresearch

Premium

उजनीच्या पाण्यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादीत जातीय संघर्ष, प्रस्थापित नेत्यांचा भरणेंना विरोध तर धनगर समाजही आक्रमक

पाणी प्रश्नावरून सोलापुरात पेटलेल्या आंदोलनाचे पडसाद आता खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटू लागले आहेत.

Solapur
आंदोलनाचे राजकीय पडसाद

एजाजहुसेन मुजावर

उजनी धरणाचे पाणी इंदापूर, बारामतीला वळविण्याच्या प्रश्नावरून सोलापुरात पेटलेल्या आंदोलनाचे पडसाद आता खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटू लागले आहेत.यात बारामतीकरांना निर्दोषत्व देत इंदापूर आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे. या प्रश्नाचे निमित्त करत त्यांना वाटेतून बाजूला करण्याचे डाव खुद्द राष्ट्रवादीतच आखले जात असून याविरोधात भरणेंच्या बाजूने आता त्यांचा धनगर समाज पुढे सरसावला आहे. सोलापूरच्या वाट्याचे हे पाणी पळवणारे खरे नेते बाजूला पडत भरणे यांना बळीचा बकरा करण्याचा हा प्रकार असल्याची टीका या धनगर नेत्यांकडून सुरू झाली आहे. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या काही वजनदार नेत्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आता उजनीच्या पेटलेल्या पाण्यामुळे सोलापूर राष्ट्रवादीमध्ये संघर्ष उभा राहिल्याचे दिसू लागले आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

उजनीच्या पाणी प्रश्नावर सोलापूर विरुद्ध बारामती वाद उफाळून आला आहे. याला राष्ट्रवादी वगळता अन्य पक्षाकडून थेट बारामती विरोधात भूमिका घेतली जात आहे. यामुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे यातून मान सोडवण्यासाठी आणि सोलापुरातील संतप्त जनतेसोबत असल्याचे भासवण्यासाठी या नेत्यांकडून या प्रश्नासाठी सुरुवातीपासून पालकमंत्री भरणे यांना आपोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे सुरू झाले आहे. यामुळे हा वाद पेटल्यानंतर त्याचा सर्वाधिक रोष हा भरणेंवर येताना दिसत आहे. वास्तविक हे पाणी इंदापूर व बारामती या दोन्ही तालुक्यांना नेण्याचा घाट आहे. तसेच हा निर्णय एकटे भरणे घेऊ शकणार नाहीत याचीही जाणीव सर्वांनाच आहे. त्यासाठी खरी शक्ती बारामतीकरांची खर्ची पडली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला शासनाकडून ३४८ कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लावलेला हातभार महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः पवार कुटुंबीयांच्या इच्छाशक्तीशिवाय उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला वळविणे शक्य नाही, हे उघड आहे. मात्र आता हा प्रश्न पेटल्यावर त्यासाठी कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे यातून भरणे यांचे नाव पुढे येत गेले आहे. यातूनच त्यांची पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादीतच जोर धरू लागली आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही वजनदार लोकप्रतिनिधींसह पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांमध्येही पद्धतशीरपणे बातम्या पेरल्या गेल्या.

उजनीचे पाणी हे निमित्त असून यामागे राष्ट्रवादीतील जातीय संघर्ष खरा असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. साखरसम्राट लोकप्रतिनिधींना भरणे हे या कारणावरूनही सुरुवातीपासूनच खुपत आहेत. भरणे यांच्या विरोधात थेट पवारांचे कान भरणारे हे नेते त्यांच्याशी संबंधित कार्यक्रमांवेळी भरणे यांच्या छबीला देखील फलकावर थारा देत नाहीत. भरणे हे पालकमंत्री असले तरी या नेत्यांनी आजवर त्यांना दूर ठेवल्याचेच दिसत आहे. उजनीचा वाद हा निमित्त करत आता पक्षातीलच या नेत्यांनी भरणेविरुद्ध रान उठवायला सुरुवात केली आहे. जाहीर पातळीवर सूचक मौन आणि आतून पेटवले जाणारे आंदोलन हे या जातीयतेचेच सूचक आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भरणे यांच्या पाठीशी त्यांच्या धनगर समाजाचे कार्यकर्ते एकवटू लागले आहेत. या भरणे समर्थक धनगर समाजाच्या मंडळींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव भाजप किंवा अन्य विरोधी पक्षांनी नव्हे तर दस्तुरखुद्द राष्ट्रवादीच्याच काही नेते मंडळींनी आखल्याचा आरोप धनगर समाजातून होऊ लागला आहे. पक्षांतर्गतच उघडपणे आरोप-प्रत्योराप सध्या सुरू झाले आहेत. धनगर समाज आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक परमेश्वर कोळेकर व आदित्य फत्तेपूरकर यांनी भरणे यांच्या समर्थनार्थ राज्यातील धनगर समाज एकत्र येऊन पंढरपुरातून बारामतीत शरद पवार यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढण्याचा इशारा दिला आहे.

पालकमंत्री भरणे हे राज्यातील धनगर समाजातील एकमेव मंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून सोलापुरात काम करीत असताना स्थानिक प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यांत ते खुपत आहे. यामागे जातीयतेची कारणे आहेत. म्हणूनच भरणे यांच्या विरोधात जाणीवपूर्वक आंदोलन पेटविण्यासाठी हीच प्रस्थापित नेते मंडळी संबंधित आंदोलकांना रसद पुरवत असल्याचाही आरोप धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या उजनीच्या पाणीप्रश्नावर जिल्ह्यात रोज कोठे ना कोठे आंदोलन पेटत असले, तरी दुसरीकडे धनगर समाजाचे कार्यकर्ते पालकमंत्री भरणे यांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गतही संघर्ष उभा ठाकला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After agitation on the ujani dam water issue ncp is facing political consequences pkd

First published on: 26-05-2022 at 15:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×