दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या राजकीय प्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. शेकापच्या माध्यमातून विजयमाला राणीसाहेब खासदार झाल्यानंतर आता संभाजीराजांनी शिवसेनेच्या मदतीने पण अपक्ष म्हणून राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरला असला तरी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजप, अपक्ष ते स्वतंत्र संघटना असा राजघराण्याचा गेल्या पाच दशकांहून अधिक काळचा प्रवास आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या अलौकिक लोककार्यामुळे कोल्हापूरच्या राजघराण्याची पताका कायम फडकत राहिली. अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व हे या राजघराण्यात झाले. असे घराणे राजकारणापासून दूर राहणे शक्य नव्हते. त्यांच्या राजकारणाला काही वेळा जनतेच्या पसंतीची मुद्रा उमटली तर २००९ मध्ये संभाजीराजे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या तगड्या पक्षाची लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतरही जनतेने नाकारले. 

छत्रपती घराण्याच्या स्वतंत्र भारतातील संसदीय राजकारणाची सुरुवात १९६७ सालच्या लोकसभा निवडणुकीने झाली. विजयामाला राणीसाहेब या निवडणुकीत शेकापकडून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर विक्रमसिंह राजे घाटगे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत श्रीमंत शाहू महाराज हेही मंचावर उपस्थित होते. यानिमित्ताने राजर्षी शाहू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे वारसदार एकत्रित आले होते. शिवसेना समवेतच्या या जुन्या राजकीय संबंधावर चर्वितचर्वण करण्याची आता छत्रपती घराण्यात कोणाला फारशी इच्छा असल्याचे दिसत नाही. तथापि, यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडे टिपणी केल्याने या घटनेला उजाळा मिळाला.

श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या पहिल्या निवडणुकीत त्यांना यशाने साथ दिली नाही. सहा वर्षांपूर्वी ते राष्ट्रपतींचे नामनियुक्त सदस्य म्हणून राज्यसभा सदस्य झाले. यामागे भाजपची राजकीय इच्छ्शक्ती हे कारण उघड असल्याने ते या पक्षाच्या जवळ गेले. मात्र भाजपच्या पूर्ण सावटात राहण्याचे त्यांनी टाळले. विधानसभा निवडणुकीमध्ये युवराज मालोजीराजे छत्रपती हे काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते. दुसऱ्या निवडणुकीत त्यांना यशाने हुलकावणी दिली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मालोजीराजे छत्रपती हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. त्यांच्या बरोबरीनेच त्यांच्या पत्नी युवराज्ञी मधुरिमाराजे यांचेही नाव काँग्रेसचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

अपक्ष ते स्वतंत्रराजकीय पक्षाच्या मंचावरून राजकारण करतानाच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने काही वेळा स्वतंत्र बाणा राखला आहे. १९८५ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रिन्सेस पद्माराजे यांचे सुपुत्र राजवर्धन कदमबांडे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना यासाठी प्रवृत्त केले होते. या निवडणुकीत त्यांच्या हाती विजयश्री लागली नाही. सर्व पक्षियांचा अनुभव घेऊन आता संभाजीराजे छत्रपती यांनी स्वबळ अजमावण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी ‘ स्वराज्य ‘ या संघटनेची स्थापना केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी ठेवायची नाही अशी त्यांची भूमिका आहे. तथापि, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा राजकीय प्रवास पुढे कसे वळण घेतो याविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After completing entire political circle now chatrapti is going to give call for his own swarajya party pkd
First published on: 29-05-2022 at 11:15 IST