रामचरितमानसबाबत वादग्रस्त विधान करणारे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत बढती देण्यात आली आहे. अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाच्या महासचिवपदी नियुक्त केलं आहे. यावरून भाजपाने समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली असून भाजपाच्या टीकेला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू असताना, दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या निर्णयानंतर विविध राजकीय चर्चांनादेखील उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम”, मुख्यमंत्री जगन रेड्डींची घोषणा

भाजपाची सपावर टीका

समाजवादी पक्षाने स्वामी प्रसाद मौर्य यांना महासचिव केल्यानंतर भाजपाने अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “रामचरितमानसाचा अपमान करणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्या यांना अखिलेश यादव यांनी पक्षाचे महासचिव केले आहे. यावरून समाजवादी पक्षाचा हिंदुत्वविरोधी चेहरा उघड झाला आहे.”, अशी टीका उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्या यांनी केली.

भाजपाच्या टीकेला अखिलेश यादवांचे प्रत्युत्तर?

भाजपाच्या या टीकेला अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात राहिला आहे. त्यामुळेच भाजपाने जातीनिहाय जनगननेलासुद्धा विरोध केला होता, अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली. तसेच भाजपाकडून सातत्याने मागासवर्गीयांच्या मनात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचबरोबर स्वामी प्रसाद मौर्या यांच्या विधानाचं समर्थन करत ‘तदन’ या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो? हे योग्य आदित्यनाथ यांनी सांगांवं, असेही ते म्हणाले.

यादवांच्या निर्णयाला पक्षातून विरोध?

विशेष म्हणजे मोर्या यांना महासचिव केल्यानंतर पक्षातील ब्राम्हण आणि ठाकूर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मौर्या यांच्या विधानानंतर अखिलेश यादव त्यांच्यावर कारवाई करतील, अशी अपेक्षा या नेत्यांना होती. मात्र, याउलट त्यांनी मोर्या यांना महासचिव केल्यानंतर त्यांनी आर्श्चय व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – “परत कधीच नितीश कुमारांबरोबर आघाडी केली जाणार नाही” बिहार भाजपाच्या कार्यकारिणीकडून ठराव मंजूर

विविध राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, अखिलेश यादव यांनी मोर्या यांना महासचिव केल्यानंतर विविध राजकीय चर्चांनादेखील उधाण आलं आहे. आगामी निवडणुकीचा विचार करत ओबीसी आणि दलित मतांवर डोळा ठेऊन अखिलेश यादव यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुस्लीम, ओबीसी आणि दलित मतांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २००७ मध्ये बसपाने याच ओबीसी, दलित आणि मुस्लीम मतांच्या जोरावर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. तर २०१२ मध्ये समाजवादी पक्षाने, तसेच २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने याच मतांच्या जोरावर सत्ता काबीज केली होती. त्यामुळे अखिलेश यादव यांनी ओबीसी, दलित आणि मुस्लीम मतांवर डोळा ठेऊन मोर्या यांना पक्षात बढती दिल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After controversial statement on ramcharitmanas swami prasad maurya promoted in samajwadi party akhilesh yadav obc politics spb
First published on: 31-01-2023 at 18:01 IST