पश्चिम बंगालमध्ये आक्रमकपणे भाजपाला टक्कर देऊन तृणमूल काँग्रेस सत्ताधारी पक्ष झाला. एका मोठ्या सत्ता संघर्षानंतर ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. याच यशाच्या जोरावर नोव्हेंबर २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसने इशान्येच्या राजकारणात पाऊल ठेवले. तृणमूल काँग्रेसने इशान्येच्या राजकारणात पाऊल ठेवताच तिथे मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. मेघालयमधील काँग्रेसच्या १२ आमदारांनी माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्या नेतृवाखाली ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मेघालयामध्ये एकही आमदार नसलेला तृणमूल काँग्रेस रातोरात सर्वात मोठा विरोधी पक्ष झाला. तृणमूल काँग्रेसच्या धमाकेदार एंट्रीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. 

आता, या घटनेला ६ महिने उलटून गेले आहेत. तृणमूल काँग्रेसची मेघालयमधील नव्याची नवलाई कदाचित संपली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये आलेल्या १२ आमदारांपैकी ४ आमदार तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याच्या विचारात आहेत. ते सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी किंवा त्यांचा मित्रपक्ष युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहेत. नॅशनल पीपल्स पार्टी सरकारमध्ये भाजपा लहान भावाच्या भूमिकेत आहे.

सुरवातीला अनेकांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो एक सक्षम असा राजकीय पर्याय उपलब्ध होईल या अपेक्षेने. सुरवातीला असलेला पक्षाचा वेग नंतर मंदावला. एका तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याने सांगितले की ” ज्या पद्धतीने पक्षाने काम करायला पाहिजे होते तसे केले नाही. अजूनही अनेक भागात पक्ष बांधणी करण्यात आली नाही. पक्षातील अनेक पदे अजूनही रिक्त आहेत. यामुळे पक्षाची लोकप्रियता हळूहळू कमी होत चालली आहे. डिसेंबरमध्ये पक्षाने एक मोठी सभा घेतली होती मात्र त्यानंतर काहीच हालचाली पक्षात होताना दिसत नाहीत.

दुसऱ्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार ‘बंगाली पक्ष’ हा टॅग मेघालयामध्ये पक्षाला अडचणींचा ठरत आहे. कारण इथला मूळ आदिवासी समाज आणि इथे राहणारे बंगाली लोक यांच्यात अनेकवेळा खटके उडत असतात. विशेषतः ग्रामीण भागात राहणारे या पक्षाला बंगाली पक्षच म्हणतात. त्यामुळे आपल्या लोकांना काय हवे आणि काय नको याची काळजी घ्यावीच लागते”.

मात्र मेघायलातील तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी या गोष्टींची शक्यता नाकारली आहे. येणाऱ्या निवडणुकीत सर्व विद्यमान आमदारांना तिकीट देणे आम्हाला शक्य नाही. नवीन लोकांना संधी देणेही आमच्यासाठी आवश्यक आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मेघालय तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळावरुन असे दिसून येते की पक्षाच्या एकत्रिकरणाचा मार्ग खडतर आहे.