बाळासाहेब जवळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रीय आहेत. सातत्याने यशाचा चढता आलेख दिलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने २०१७ मध्ये मात्र पवारांचे नेतृत्व सपशेल नाकारले. या घटनेला पाच वर्षे उलटली तरीही अजित पवारांच्या मनात पराभवाचे शल्य अजूनही कायम आहे.

आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सोसायटीधारकांचा मेळावा थेरगावात आयोजित केला. दसऱ्याचा सण असूनही आणि भल्या सकाळची वेळ असतानाही मेळाव्याला चांगली गर्दी झाली होती. या वेळी बोलताना अजित पवारांनी, १९९१ पासून शहराशी असलेले नाते विशद केले. शहराची वाढ कशी होत गेली, विकास कसा झाला, याचे सविस्तर वर्णन केले. गेल्या ३१ वर्षांत पिंपरी-चिंचवडकरांनी आपल्याला साथ दिल्याबद्दल त्यांनी शहरवासियांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली. त्याचवेळी, २०१७ च्या निवडणुकांचा अपवाद घडल्याची बाब अधोरेखित केली.

हेही वाचा… Maharashtra News Live : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर

फेब्रुवारी २०१७ मध्ये पिंपरी पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यात अजितदादांचे नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्याआधी पवारांचे अर्थात राष्ट्रवादीचे शहराच्या राजकारणावर वर्चस्व होते. तत्कालिन परिस्थितीत भाजपची अवस्था दयनीय म्हणता येईल अशीच होती. मात्र, पवारांच्या तालमीत तयार झालेले लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे दोन्ही आमदार त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले आणि शहराच्या राजकारणाची दिशाच बदलली. ज्या भाजपचे अवघे तीन नगरसेवक होते. त्यांची संख्या थेट ७७ वर (१२८ पैकी) जाऊन पोहोचली आणि भाजप हा शहरातील सर्वात प्रबळ पक्ष बनला. दुसरीकडे, ज्या राष्ट्रवादीने २० वर्षे शहरावर राज्य केले, त्या राष्ट्रवादीची संख्या ३६ पर्यंत खालावली.

हेही वाचा… Dasara Melava 2022 : मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यात पालिका निवडणुकांचे रणशिंग

राज्याच्या राजकारणात प्रभावी नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शहराचा कारभार एकहाती सांभाळणाऱ्या अजित पवारांच्या दृष्टीने हा पराभव धक्कादायक होता. गाव ते महानगर असा प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, याविषयी कोणाचेही दुमत नाही. तरीही त्यांचे नेतृत्व शहरवासियांनी नाकारले. त्यापाठोपाठ, अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला, त्यात पिंपरी-चिंचवडकरांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. या दोन्ही घटनांमुळे अजित पवार प्रचंड दुखावले होते. बराच काळ ते पिंपरी-चिंचवडकडे फिरकले नव्हते. त्यानंतरही ते शहरात आले, तेव्हा त्यांनी २०१७ च्या पराभवाबद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी सोसायटीधारकांच्या मेळाव्यातही तो मुद्दा त्यांनी पुन्हा अधोरेखित केला. आम्ही कमी पडलो, अशी कबुली देतानाच आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तो सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After five years still ajit pawar not forget the defeat in pimpri chinchwad corporation election print politics news asj
First published on: 06-10-2022 at 11:36 IST