Siddaramaiah vs DK Shivakumar News : राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण मानलं जातं. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व विजय मिळवला आणि महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापना केली. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली, तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. विशेष बाब म्हणजे, महायुतीनं शिंदेंच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. प्रत्यक्षात मात्र या अटकळी हवेतच उडून गेल्या आणि शिंदे हे मुख्यमंत्रिपदावरून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर घडलेलं नाराजीनाट्य हे संपूर्ण राज्याला सर्वश्रुत आहे. दरम्यान, महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकमध्येही मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार असून ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्रिपद हे त्यामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये पुन्हा काँग्रेसने सत्तास्थापन केल्यानंतर सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्याकडे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद राहील, असं सांगितलं जात होतं. मात्र, आता कर्नाटकातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं असून सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.
कर्नाटकमध्ये २५ वर्षांत १३ मुख्यमंत्री
कर्नाटकमध्ये २००० पासून आतापर्यंत १३ मुख्यमंत्र्यांनी सत्ता सांभाळली असून काहींनी अनेकदा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या २५ वर्षांमध्ये फक्त एकाच नेत्याने मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. २०१८ मध्ये सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात कोणीही आव्हान देणारा नेता नव्हता. मात्र, त्यांच्या सध्याच्या दुसऱ्या कार्यकाळात सुरुवातीपासूनच सिद्धरामय्या यांच्या खुर्चीला आव्हान दिलं जात आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री व कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हेदेखील मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
आणखी वाचा : मुंबईतील मराठी भाषिकांची संख्या कमी का होतेय? हिंदीचा टक्का कशामुळे वाढतोय?
मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच का सुरू झाली?
- मे २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.
- तेव्हापासूनच शिवकुमार यांना अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी विधाने त्यांच्या गटातील नेते करीत आहेत.
- काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी अशी मागणी करणाऱ्या आमदारांना अनेकदा समज दिली; पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
- काही दिवसांत सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला अडीच वर्षे पूर्ण होणार असून पुन्हा त्यावरून चर्चा सुरू झाली आहे.
- गेल्या दहा दिवसांत काँग्रेसमधील काही आमदारांनी डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अनेकदा वक्तव्ये केली,
- त्यामुळे सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्या गटात मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळालं.
- काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना दोन्ही नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी पाठवलं.
- सुरजेवाला यांनी दोन्ही गटातील आमदारांबरोबर बैठका घेतल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद शांत झाला.
हेही वाचा : शरद पवारांनी ‘जय कर्नाटक’ची घोषणा कुठे दिली होती? मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदावरून माघार का?
बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यावर शिवकुमार म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यामागे उभे राहण्याची माझी जबाबदारी आहे. त्यानंतर सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या. तरीही काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाबाबतचा पेच अद्याप सुटलेला नाही. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर सिद्धरामय्या हे ३० महिने मुख्यमंत्री राहणार असे ठरले होते, म्हणजेच त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार होता; पण अद्याप याबाबत पक्षाकडून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

सिद्धरामय्या-शिवकुमार यांच्यातील संघर्ष
काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, वर्षाअखेरीस कर्नाटक मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. “२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, ओबीसी आणि अल्पसंख्याकांमधील लोकप्रियता पाहता पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांच्यावर विश्वास दाखवला.” त्यांच्या मते हा घटक नेतृत्वबदलाच्या वेळी काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकतो. दरम्यान, शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नसले तरी त्यांना डावलण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आलेली आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री पदाबरोबर बंगळुरू विकास आणि जलसंपदा खातेही त्यांना देण्यात आले आहेत. मात्र, ही ‘सत्तेची एकवटलेली मक्तेदारी’ सिद्धरामय्या गटाला रुचलेली नाही, असे एका नेत्याने स्पष्ट केले.
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच
गेल्या महिन्यात सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटातील प्रमुख मंत्री के. जे. जॉर्ज, सतीश जरकीहोळी आणि एच. सी. महादेवप्पा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन शिवकुमार यांना कर्नाटक काँग्रेस अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच रामनगरचे आमदार आणि शिवकुमार यांचे कट्टर समर्थक इक्बाल हुसेन यांनी “उपमुख्यमंत्री पुढील दोन महिन्यांत मुख्यमंत्री होतील,” असे विधान केले होते.
या पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, “शिवकुमार यांना मुख्यमंत्री केल्यास वोक्कलिगा समाजाचे समर्थन पक्षाला मिळू शकते, अन्यथा पुढील निवडणुकीत काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या नेत्याच्या मते, “जर शिवकुमार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष अध्यक्षपद कायम राहिले, तर सिद्धरामय्या सहजपणे मुख्यमंत्रिपदाचा पदत्याग करणार नाहीत. मात्र, जर त्यांच्या गटातील कोणीही प्रदेशाध्यक्षपदी येत असेल तर नेतृत्व बदलाची संधी तयार होऊ शकते.” सध्या सिद्धरामय्यांचे कट्टर समर्थक सतीश जरकीहोळी यांचे नाव पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे, मात्र या विषयावरील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
सिद्धरामय्या इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
सिद्धरामय्या यांनाही मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्याची इच्छा आहे, कारण ते राज्यात इतिहास रचण्याच्या शर्यतीत आहेत. येत्या मार्चपर्यंत सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रिपद राहिल्यास ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहणारे एकमेव नेते ठरतील. सध्या हा विक्रम दिवंगत नेते डी. देवराज उर्स यांच्या नावावर असून, त्यांनी सात वर्षे आणि २३८ दिवस मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. कर्नाटक काँग्रेसमधील ही अंतर्गत धूसफूस आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम घडवून आणणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद इथेच शमणार की पुढेही चालूच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.