मधु कांबळे

राज्यसभा निवडणुकीत अगदी अटीतटीच्या आणि काहिशा संशयाच्या वातावरणातही अधिकची मते घेऊन आपला उमेदावर विजयी करुन एकसंधतेचे दर्शन घडविणाऱ्या काँग्रेसची घडी  पुढे विधान परिषद व नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विस्कळीत झाल्याचे दिसले. त्यातून वेगळ्याच राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाल्यामुळे पुढील काळात निवडणुका जिंकण्यापेक्षा काँग्रेसमध्ये एकोपा ठेवणे हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे मानले जात आहे.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
Congress Sangli, Sangli Lok Sabha,
सांगलीत काँग्रेसचा लागोपाठ दुसऱ्यांदा विचका, वसंतदादांच्या घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

गेली तीस वर्षे भाजप व शिवसेना क्रमांक एकचा शत्रू मानणाऱ्या काँग्रेसने वैचारिकदृष्ट्या टोकाचा विरोध असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकच असलेल्यया शिवसेनेशी हातमिळवणी करीत सत्तेत शिरकाव केला. आता सत्ताही गेली. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाचा चांगला, वाईट परिणाम हा आगामी निवडणुकांमधून दिसून येईल. परंतु आघाडीची सत्ता जाता जाता ज्या घटना, घडामोडी घडल्या, त्यात आपला जुना राजकीय मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेस थोडी अधिक डळमळीत झाल्याचे दिसले.

राज्यातील सत्तांतर वगनाट्यापूर्वीची राज्यसभा व विधान परिषद निवडणूक ही गणगौळण ठरली. दोन्ही निवडणुका अत्यंत अटीतटीच्या आणि काहीशा कोण फुटणार, किती जण फुटणार अशा संशयाच्या वावटळीतच पार पडल्या. काँग्रेसने आपला मतांचा कोटा पूर्ण करुन अधिकची दोन मते घेऊन आपल्या उमेदवाराचा नियोजनपूर्वक विजय घडवून आणला. त्यावेळी पक्षाचे ज्य़ेष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व इतर ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्नही दिसले. एक मतही इकडे तिकडे झाले नाही. परंतु विधान परिषद निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिलेला पहिल्या पसंतीचा उमेदवार आपल्याच पक्षाच्या उमेदवाराकडून पराभूत झाला. ही काँग्रेससाठी मोठी नामुष्की होती. राज्यसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या एकसंधतेला तडा गेला. त्यानंतर आघाडीची सत्ताही गेली.

रविवार व सोमवार असे दोन दिवस पार पडलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला तरी, काही प्रमाणात एकोपा दिसला. पराभव होणार हे निश्चित असतानाही आघाडीने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आणि माघार न घेता निवडणुकीला सामोरे गेले. अपेक्षे प्रमाणे भाजपचे राहुल नार्वेकर विजय झाले आणि आघाडीचे शिवसेना उमेदवार राजन साळवी पराभूत झाले. १६४ विरुद्ध १०७ असा हा निकाल लागला. परंतु आघाडीला खात्री करुन घेता आली की त्यांच्याकडे किती संख्या बळ आहे. मात्र आघाडीचा हा एकोपा दुसऱ्याच दिवशी झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राखता आला नाही.

शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने १६४ तर विरोधात ९९ मते पडली. सभागृहात पोहोचायला थोडा विलंब झाल्यामुळे अशोक चव्हाण व अन्य आमदारांना मतदान करता आले नाही. त्याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदारही गैरहजर होते. त्याची संधी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानून काँग्रेसमध्ये एक संशयाची तुडतुडी टाकून दिली. त्यामुळे भविष्यात काँग्रेसमध्ये काही वेगळे घडण्याची शक्यता आहे का, अशा चर्चा सुरु झाल्या. परंतु अशोक चव्हाण यांनी त्यावर स्पष्टीकरण देत अशा चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र  राज्यसभा निवडणुकीत मजबूत एकोपा दाखविणाऱ्या काँग्रेसमधील पुढील निवडणुका व राजकीय घडोमोडीत विस्कळीतपणा समोर आला.

राज्यात पुढच्या राजकीय लढाया या भाजप व शिवसेना यांच्यात होतील, असे दिसते.  राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवार यांची पकड आहे तोपर्यंत, तो पक्षही स्पर्धेत मुसंडी मारेल. काँग्रेसचे नेमके स्थान काय राहणार हा प्रश्न आहे. पुढील काळात निवडणुका जिंकण्यापेक्षा पक्षात एकोपा ठेवणे हेच सर्वात मोठे आव्हान राहणार आहे.

राजकीय अर्थ काढू नये: अशोक चव्हाण

साधारणपणे विश्वासदर्शक ठरावावर आधी चर्चा होते व मग मतदान होते. पंरतु एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावावर आधी मतदान घेतले गेले. वाहतूक कोंडीमुळे सभागृहात पोहचायला केवळ दोन-तीन मिनिटांचा उशीर झाला, त्याचवेळी दरवाजे बंद केले गेले. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेता आला नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. मात्र त्यामुळे कोणताही वेगळा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.