रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे महाविकास आघाडीसमर्थित सुधाकर अडबाले यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे बारा वर्षांपासून प्रतिनिधीत्व करणारे शिक्षक परिषदेचे भाजपसमर्थित नागो गाणार यांचा पराभव केला. या निवडणुकीत अखेरच्या क्षणी काँग्रेसने अडबाले यांना समर्थन जाहीर केले होते. आता मात्र अडबाले काँग्रेस नेत्यांच्याच प्रयत्नाने विजयी झालेत, अशी सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. अपक्ष निवडून आल्यामुळे अडबालेंसमोर काँग्रेसच्या कोणत्या गटात सक्रिय व्हायचे, हा प्रश्न उभा ठाकला आहे.

नागो गाणार जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावू न शकल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी होती. हाच मुद्दा घेऊन अडबाले सातत्याने संघर्ष करत राहिले. त्याच संघर्षाचे परिवर्तन विजयात झाले. गेल्या ७५ वर्षात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे अडबाले चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलेच आमदार ठरले आहे. अडबाले २०२१ पासूनच नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा दौरा करत होते, शिक्षकांच्या समस्या मांडत होते, सर्व शिक्षक संघटनांशी समन्वय कसा ठेवता येईल, यासाठी काय करता येईल, यावर काम करीत होते. २००४ साली चंद्रपूरमध्ये त्यांनी नागपूर विभाग शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था सुरू केली. सहाही जिल्ह्यात पतसंस्थेच्या शाखा सुरू केल्या. आज या पतसंस्थेचे ६ हजार ४०० सदस्य आहेत. विशेषत: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने त्यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर केले होते. सुरुवातीला १८ शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. त्यानंतर इतरही संघटना त्यांच्या जवळ येण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा… संसदेच्या कामकाजावरून विरोधकांमध्येच मतभेद

राजकीय घडामोडीत नागपूरची जागा शिवसेनेच्या तर नाशिकची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. परंतु ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. बदलत्या राजकीय परिस्थितीत नागपूरची जागा काँग्रेसकडे आली. यानंतर काँग्रेसमध्ये कुणाला समर्थन द्यावे, यावरून बराच खल झाला. हे पाहता, काँग्रेसने विश्वासघात केल्याचा आरोप अडबाले यांनी केला. मात्र, याचदरम्यान माजी मंत्री आ. सुनील केदार व आ. विजय वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विश्वासात न घेताच अडबाले यांना काँग्रेसचे समर्थन जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीने समर्थित उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. पाहता पाहता ३६ संघटना अडबालेंच्या पाठिशी आल्या. यामुळे अडबालेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

हेही वाचा… योगी सरकारचा अदानी समुहाला झटका, ५ हजार ४५४ कोटी रुपयांचं काम रद्द

अडबाले अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, ते आपल्यामुळेच विजयी झाल्याचा दावा काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते करीत आहेत. विजयानंतर अडबाले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार नरेश पुगलिया यांचा आशीर्वाद घेतला. खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर यांनी अडबालेंच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. विजयी मिरवणुकीतही धानोरकर दाम्पत्य त्यांच्यासोबतच होते. तर, अडबाले यांना काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे समर्थन मिळवून देण्यासाठी आ. वडेट्टीवार यांनी पुरेपुर प्रयत्न केले. यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वच गट आता अडबालेंना आपल्या गटात आणण्यासाठी सक्रिय झाले आहे. अडबाले भविष्यातील राजकारणासाठी काँग्रेसच्या सक्रिय गटांपैकी कोणत्या गटाचा हात धरतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After success in vidhan parishad election in nagpur competition started among congress groups print politics news asj
First published on: 07-02-2023 at 11:18 IST