संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार हे भाजपच्या जवळ असल्याचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी  केलेला आरोप किंवा आंबेडकर यांच्या युतीचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवरून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती प्रत्यक्षात आल्यापासून महाविकास आघाडीतच कटकटी सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर यांचा ‘नवीन घरोबा’ कितपत यशस्वी होणार ?

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. यामुळेच शिवसेना-आंबेडकर युतीबाबत विचारले असता पवार यांनी मी या भानगडीत पडत नाही, असे प्रत्युत्तर दिले होते. युतीची घोषणा करताना शरद पवार यांनी आमच्याबरोबर यावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले यावरून राष्ट्रवादीत प्रतिक्रिया उमटली. शरद पवार हे आंबेडकर यांच्याबरोबर कशाला येतील, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने व्यक्त केली होती. शिवसेना व वंचित बहुजन आघाडी युतीचे अजित पवार किंवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावध भूमिका व्यक्त केली होती.

हेही वाचा >>> नागपुरात नवा पेच…शिक्षक मतदारसंघात ‘मविआ’ विरुद्ध वंचित!, सेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का,ही चर्चा रंगली असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल संशय व्यक्त करणारे वक्तव्य केले. पवारांच्या भाजप जवळिकीच्या आरोपांवर आंबेडकर ठाम असल्यास वंचितबरोबर कधीच आघाडी होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने व्यक्त केली. दुसरीकडे, काँग्रेसनेही वंचितबाबत नाके मुरडली आहेत. शिवसेना व वंचित युतीचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर हे सातत्याने राष्ट्रवादी व काँग्रेसवर टीका करतात. यामुळेच आंबेडकर यांच्या युतीचे स्वागत करण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते फारसे उत्सूक नाहीत.

हेही वाचा >>> अमरावती पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार ?

प्रकाश आंबेडकर हे पुढील काही दिवसांत कोणती भूमिका घेतात वा काँग्रेसबद्दल कोणती वक्तव्ये करतात याचा अंदाज घेऊनच वंचितबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसच्या एका नेत्याने स्पष्ट केले. संजय राऊत हे राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत असले तरी आंबेडकर हे सातत्याने काँग्रेसवर टीका करणार असल्यास त्यांच्याशी हातमिळवणी कशी करणार, असा सवालही केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the shivsena vanchit alliance mahavikas aghadi increase problems print politics news ysh
First published on: 28-01-2023 at 11:40 IST