लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट अशा विविध घटक पक्षांची विधानसभा निवडणुकीत जागावाटपात अधिक जागांची अपेक्षा वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. सांगलीतील अपक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निकालांचा विधानसभासंघनिहाय विचार केल्यास महाविकास आघाडीला १६०च्या आसपास मतदारसंघांत आघाडी मिळाली आहे. महायुती १२५ जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत हाच कल राहू शकतो, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे. राज्यात सत्तांतर अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

हेही वाचा – मराठवाड्यातील शिवसेनेवर ठाकरे की शिंदे कोणाचे वर्चस्व अधिक ?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मित्र पक्षांना एकही जागा सोडली नव्हती. तेव्हा विधानसभा निवडणुकीत अधिक जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होेते. लोकसभेचा निकाल जाहीर होताच समाजवादी पक्षाने ३५ जागांची मागणी केली आहे. समाजवादी पार्टीचे सध्या दोन आमदार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२ जागांची मागणी केली आहे. माकपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन १२ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. माकपच्या शिष्टमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, नरसय्या आडम, जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव आदींचा समावेश होता.

दिंडोरी मतदारसंघातून जे. पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीचा राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार भास्कर भगरे यांना फटका बसू शकला असता. कारण जीव पांडू गावित यांना यापूर्वी एक लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. ही जागा लढण्याबबात माकपचे राज्यातील नेते आग्रही होते. शेवटी शरद पवार यांनी माकपचे सरचिटणीस सीताराम येचूरी यांच्याशी चर्चा केल्यावर माकपने माघार घेतली. यामुळे राष्ट्रवादीचा विजय सूकर झाला. तेव्हा दिलेल्या आश्वासनानुसार महाविकास आघाडीने माकपचा जागावाटपात विचार करावा, अशी पक्षाची भूमिका आहे.

हेही वाचा – प्रियांकांसाठी राहुल गांधींनी वायनाड का सोडलं? काय आहे कारण?

समाजवादी पार्टीचे आमदार अबू असिम आझमी यांच्या शिवाजीनगर-मानखूर्द तर दुसरे आमदार रईस शेख यांच्या भिवंडी मतदारसंघाने महाविकास आघाडीला हात दिला. शिवाजीनगर-मानखूर्दमुळे ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना विजय मिळाला. भिवंडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रे यांच्या विजयात भिवंडीतील सपाचा मोठा हातभार लागला. यामुळेच या दोन मतदारसंघांबरोबरच आणखी काही मतदारसंघ मिळावेत, अशी सपाची मागणी आहे.