एजाजहुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : राज्यात शिवसेनेतील फुटीपश्चात सगळ्याच राजकीय नेत्यांचे प्रवास आता एकतर भाजप नाहीतर शिवसेनेतील शिंदेगटाच्या दिशेने सुरू झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात अगोदरच भाजपचे प्राबल्य असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे उर्वरित चारही आमदारदेखील भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरातील शिंदेशाही पूर्णपणे संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक चाली खेळण्यास सुरुवात करत पूर्वाश्रमीचे शिंदे यांचे सहकारी महेश कोठे यांना आपल्या गटाकडे आकर्षित करत शिंदेकन्या आमदार प्रणिती शिंदे यांची कोंडी सुरू केली आहे.  शिंदे गटाने प्रामुख्याने शिवसेनेला सुरूंग लावण्याबरोबरच अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांची उपयुक्तता तपासून त्यांना आपल्या कळपात आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात दुसऱ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते शिल्लक राहतील का असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे एकनाथांच्या ‘शिंदेशाही’ला चांगले दिवस येत असताना दुसरीकडे सुशीलकुमारांची ‘शिंदेशाही’ धोक्यात येऊन भुईसपाट होण्याच्याच मार्गावर आहे.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक वर्षे सोलापुरातून विधानसभेत आणि संसदेत नेतृत्व केले होते. ३५-४० वर्षांच्या सत्ताकारणात राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री ते राज्यपालपदापासून ते केंद्रीय ऊर्जा आणि गृहमंत्रीपदासह लोकसभेच्या नेतेपदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. परंतु अलीकडे दहा वर्षांत त्यांची मोठी पिछाडी झाली असून आता त्यांच्या हातून सोलापूर पार निसटले आहे. स्थानिक पातळीवर सुशीलकुमार शिंदे हे जवळपास निवृत्तीचे दिवस काढत असून त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे त्यांचा वारसा चिवटपणे चालवत आहेत. परंतु भाजपने ‘शिंदेमुक्त सोलापूर’ करायचा विडा उचललेला दिसतो. शिंदे यांचे अतिशय विश्वासू सहकारी असलेले बडे बांधकाम उद्योजक बिपीन पटेल यांच्या एम. एम. पटेल चॕॅरिटेबल ट्रस्ट संचालित अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयासह त्यांच्या मेहूल कन्ट्रक्शन कंपनीवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून कारवाई केली आहे. या कारवाईचा राजकीय अन्वयार्थ लावताना काही जुन्या-नव्या घडामोडी समोर येतात. एक तर प्राप्तिकर विभागाच्या कारवाईकडे सुशीलकुमार शिंदे यांना शह देणारी म्हणून पाहिले जाते. दुसरीकडे पटेल यांचे अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय ताब्यात घेण्याचाही खटाटोप असल्याचे मानले जाते. मुळातच हे वैद्यकीय महाविद्यालय १५ वर्षांपूर्वी भाजपचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उभारले होते. त्या वेळी केंद्रात सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा प्रभाव होता. योगायोग किंवा अडचणी म्हणा, त्या वेळी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल वैद्यकीय महाविद्यालयास अधिकृत मान्यता मिळू शकली नाही. त्यांना आपण उभारलेली वैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण मालमत्ता बिपीन पटेल यांच्या एम. एम. पटेल चॕॅरिटेबलकडे हस्तांतरित करावी लागली. नंतर थोड्याच दिवसांत तेथे अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या वैद्यकीय महाविद्यालयाचे थाटात उद् घाटन झाले होते. सुभाष देशमुख यांच्या मनात त्याची बोच आजही आहे. याच पार्श्वभूमीवर काशीच्या जंगमवाडी मठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी सोलापुरात होटगी वीरशैव बृहन्मठामार्फत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. होटगी मठाकडे सोलापूर व शेजारच्या कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समाजात गुरुपीठ म्हणून आदराने पाहिले जाते. काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी पूर्वी याच होटगी मठाचे अधिपती होते. लिंगायत समाज भाजपची हक्काची मतपेढी मानली जाते. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे अर्थात भाजपचेच. अलीकडे दस्तुरखुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी होटगी मठात येऊन मठाधिपतींची भेट घेऊन बंद खोलीत चर्चाही केली होती. होटगी मठाला वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यासाठी भागवत यांनी शब्द टाकल्याचे बोलले जाते. आता प्राप्तिकर विभागाने सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी बिपीन पटेल यांच्याशी संंबंधित आस्थापनांवर छापे टाकून केलेली कारवाई पुरेशी बोलकी मानली जात आहे. पटेल यांच्या ताब्यातील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय होटगी मठाच्या ताब्यात गेले तर त्याचा सर्वाधिक आनंद आमदार सुभाष देशमुख यांना वाटणे स्वाभाविक असेल. शेवटी ‘कालाय तस्मेय नमः’

हेही वाचा <<< प्रशांत बंब यांच्या वक्तव्यामुळे भाजपभाेवती शिक्षकांचे माेहाेळ

या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न असताना त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची कोंडी करून भविष्यात आपल्याकडे खेचण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. दुसरीकडे याच सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचे क्रमांक एकचे शत्रू मानले जाणारे आणि काँग्रेसमधून शिवसेना आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाण्याच्या बेतात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आकर्षिले गेलेले माजी महापौर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा डाव मोडून शिंदे गटात जाण्याची मानसिकता पक्की केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोठे यांना राज्यपा नियुक्त विधान परिषद सदस्य करण्याचे मधाचे बोट दाखविले आहे. म्हणूनच की काय, कोठे यांनी आपले विश्वासू सहकारी शिंदे गटात पाठविले आहेत. कोठे हे विधान परिषदेवर गेल्यास त्यांचे आमदारकीचे घोडे एकदाचे गंगेत न्हाईल. त्याचा उपद्रव सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना होईल हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aggressive chief minister shinde bjp end susheel shindeshahi political leaders shinde group print politics news ysh
First published on: 13-09-2022 at 15:30 IST