महेश सरलष्कर

दिल्लीतील राजाजी मार्गावरील निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे बारकाईने वृत्तपत्र वाचत होते. ‘अग्रलेख आणि वैचारिक लिखाण मी नजरेखालून घालतो. मुद्देसूद मांडणी करताना या वाचनाची खूप मदत होते’, खरगे सांगत होते. खरगेंचे म्हणणे होते की, हे दिवस संघर्षाचे आहेत. संघ-भाजपच्या मुद्द्यांचा काँग्रेसला प्रतिवाद करावाच लागेल. पण, प्रतिवादासाठी मुद्दे तुमच्याकडे असले पाहिजेत. नाही तर भाजपसमोर उभे कसे राहणार?… वयाच्या ऐंशीव्या वर्षीही खरगे भाजपविरोधात वैचारिक-राजकीय संघर्ष करण्याची ऊर्जा बाळगून आहेत. देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी कसा संघर्ष केला पाहिजे, यावर खरगेंनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर भाष्य केले.

१६ व्या लोकसभेत २०१४ ते १९ ही पाच वर्षे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे गटनेते होते. त्याकाळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरगेंवर मिश्किल टिप्पणी केली होती. ‘खरगेंच्या मार्गदर्शनाची संधी लोकसभेला पुन्हा मिळेलच असे नाही’, असे मोदी म्हणाले होते. मोदींची ही भाषा खरगेंना आवडली नव्हती पण, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खरगेंचा पराभव झाल्याने त्यांना लोकसभेत जाता आले नाही. पण, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खरगेंना राज्यसभेची उमेदवारी दिली. गुलामनबी आझाद निवृत्त झाल्यामुळे खरगे राज्यसभेत विरोधपक्ष नेते झाले. खरगे म्हणतात, ‘हा काव्यगत न्याय म्हणायला हवा’! विरोधात आक्रमक बोलणारा विरोधी नेता भाजपला नको असतो. पण, त्यांची माझ्यापासून सुटकाच होऊ शकलेली नाही. लोकसभेत नाही तर राज्यसभेत मी भाजपविरोधात आक्रमक बोलणारच’…

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून गुलामनबी आझाद पुरेसे आक्रमक नव्हते, हीच खरगेंची आझादांबद्दल मोठी नाराजी आहे. ‘वैयक्तिक संबंध उत्तम असू शकतात पण, कणखरपणे वैचारिक भूमिका मांडण्यापासून तुम्ही कचरत असाल तर राज्यसभेत विरोधी पक्षांच्या बाकावर कशासाठी बसायचे?’. खरगे विरोधीपक्षनेते झाल्यापासून राज्यसभेत विरोधीपक्ष अधिक आक्रमक झाला आहे. राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ ७०हून अधिक होते, आता जेमतेम ३१ सदस्य आहेत. त्यातही काही जुन्या-जाणत्यांचा सक्रिय सहभाग कमी झालेला आहे. त्यामुळे राज्यसभेत खरगेंकडे भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचा सशक्त चमू राहिलेला नाही. तरीही खरगे म्हणतात, ‘संघर्ष तर केला पाहिजे!…

काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे. आपले भाषण झाले की, निघून जाऊ नये. तुमच्या मुद्द्यांवर मंत्री उत्तर देईल तेव्हा तुम्ही सभागृहात हजर असले पाहिजे. मंत्र्याच्या उत्तराचाही प्रतिवाद केला पाहिजे. रिंगणात उतरल्याशिवाय संघर्ष कसा करता येईल? भाजपविरोधात संघर्ष करायचा तर सभागृहात मुद्द्यांच्या आधारावर जशास तसे उत्तर दिले पाहिजे’… संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महागाईवरील चर्चेत केंद्र सरकारविरोधात शाब्दिक हल्लाबोल करण्यात खरगे आघाडीवर होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधी नेत्यांना सडेतोड उत्तर दिले होते. पण, काही काँग्रेसनेते मंत्र्यांचे उत्तर ऐकण्यासाठी उपस्थित नव्हते. तर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी नाहक सभात्याग केला होता.

आझादांबद्दल बोलताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू येतात पण, खरगेंबद्दल बोलताना मोदींच्या भाषणात टीकेचा सूर असतो. त्यावर, खरगे म्हणतात, ‘मी भाजपला विरोध करतो, खरेतर ते मला घाबरतात. लोकसभेतही मी त्यांना प्रश्न विचारत होतो. भाजपच्या सदस्यांचे इतिहासाचे वाचन, आकलन कमी आहे. मला जेवढी माहिती आहे, तेवढी लोकसभेतील भाजपच्या कोणा सदस्याकडे नसेल. म्हणूनच मी मांडलेली वस्तुस्थिती ते खोडून काढू शकत नाहीत’… भाजप सरदार पटेलांवर हक्क सांगतो. पण, पटेल फक्त भाजपने नाहीत, पटेलांच्या योगदानाबद्दल सांगायचे असेल तर, आधी त्यांच्याबद्दल वाचले पाहिजे. सावरकरांबद्दल बोलायचे असेल तर त्यांच्याविषयी वाचा. मी वाचन केलेले असल्यामुळेच सावरकरांच्या वैचारिक भूमिकेविरोधात बोलू शकतो. मुद्द्यांच्या आधारावर भाजपचे युक्तिवाद खोडून काढले पाहिजेत. हे जर मी करत असेन तर, भाजप माझ्याबद्दल अश्रू का ढाळेल?

खरेतर भाजपच्या नेत्यांनी राजकारणाचा स्तर खालावत नेला आहे. वस्तुस्थिती न पाहता, सत्य जाणून न घेता विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती भाजपमध्ये बळावली आहे, असे खरेगेंचे म्हणणे आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये कन्याकुमारीतील विवेकानंदाच्या स्मारकाला राहुल गांधींनी भेट दिली नसल्याचा निखालस खोटा आरोप भाजपच्या नेत्या व केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. पण, काँग्रेसने विवेकानंदांना अभिवादन करणारे छायाचित्र प्रसिद्ध करून काँग्रेसने आरोप खोडून काढला. ‘आरोप करण्याआधी घटनेची शहानिशा तरी करून घ्या, मग, बोला. राजकारणातील किमान शिस्तही तुम्ही पाळणार नसला तर, तुम्ही कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहात, हे स्पष्ट होते’, असे खरगेंचे म्हणणे होते. पक्षाध्यक्ष गांधी कुटुंबातील असो वा गांधीतर, खरगेंची काँग्रेसच्या विचारांशी पक्की बांधिकली आहे, त्या आधारावर संघ-भाजपविरोधात संघर्ष करतच राहावा लागेल, असे ते मानतात.