अहिल्यानगर: सहकार क्षेत्रातील लांबणीवर पडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुकही त्यामुळे मार्गी लागत आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेवर सुरुवातीच्या काळात काँग्रेसचे नंतर, बाळासाहेब थोरात-शरद पवार गटाचे वर्चस्व राहिले. आता राज्यातील आणि जिल्ह्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर बँकेच्या निवडणुकीत कशी समीकरणे जुळतात आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश होतो, याकडे लक्ष राहणार आहे.

राज्यात ज्या मोजक्या जिल्हा बँका आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत मानल्या जातात, त्यामध्ये नगरची जिल्हा बँक अग्रणी आहे. सहकार क्षेत्रातील जुन्या मातब्बरांनी बँकेला आर्थिक शिस्त लावली. त्याचा उपयोग आजही होत आहे. आता बँकेने अत्याधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. शेतकऱ्यांची बँक असा लौकिक सांगितला जात असला तरी बँकेवर साखर कारखानदारांचे वर्चस्व आहे.

काँग्रेस एकसंघ होती, त्यावेळी पक्षातील दिग्गजांचे बँकेवर वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सहकारासह इतरही क्षेत्रात बाळासाहेब विखे- राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात काँग्रेसमधीलच बाळासाहेब थोरात व शरद पवार गट एकत्र येत निवडणुका लढवू लागले. जिल्हा बँक हे त्याचे मध्यवर्ती केंद्र ठरले. बॅंकेतील समीकरणांचे पडसाद जिल्हा परिषदेत उमटत. बाळासाहेब थोरात-शरद पवार गटाने बँकेवर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले.

राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली, तसे त्याचे पडसाद जिल्हा बँकेत उमटू लागले. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात थोरात-पवार गटाने बँकेवरील प्राबल्य कायम ठेवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्याचा परिणाम बँकेवरही झाला आणि इतिहासात प्रथमच बँकेचे अध्यक्षपद भाजपकडे आले. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालावे लागले. आता जिल्ह्यातील शरद पवार गट कमकुवत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्य पातळीवरून लक्ष घालणारे, जिल्ह्याविषयी जाणकार नेतृत्व राहिले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व वाढलेले आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेत पराभव झाला असला तरीही सहकारातील त्यांचे प्राबल्य कमी झालेले नाही. भाजपमधीलच विवेक कोल्हे व विखे यांच्यातील वैमनस्याला धार आलेली आहे. थोरात-कोल्हे यांनी एकत्र येत विखेंच्या वर्चस्वाला गणेश कारखान्याच्या क्षेत्रात आव्हान दिले आहे. माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी स्वतंत्र वाटचाल ठेवली आहे. विखे यांच्याशी सख्य नसलेल्या भाजपचेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेत लक्ष घालणार असल्याचे सुतोवाच केले आहे. शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके व बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये सामंजस्य वाढलेले आहे. संचालक करण ससाणे विखे यांच्यापासून अंतर राखून आहेत.

राज्यातील आणि जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवी समीकरणे जुळण्यास बळ देणारी आहे. बँकेवर प्रामुख्याने साखर कारखानदारांचे वर्चस्व आहे. या कारखानदारांना केंद्र व राज्यातील सत्तेचा आधार हवा असतो. ही समीकरणे जुळताना हा मुद्दाही प्रबळ ठरणार आहे. उदय शेळके व शिवाजी कर्डिले या दोन्ही अध्यक्षांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संचालक पद देण्यात आल्याने बँकेत नवे चेहरे आले. याशिवाय कारखान्याचे अध्यक्ष असलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचा बँकेत प्रवेश होणार का, याकडेही लक्ष लागलेले आहे. त्यांच्यासह अन्य कोणते नवे चेहरे बँकेत दिसणार याबद्दलही उत्सुकता आहेच.