अहिल्यानगर: महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे यांची तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची नावे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केली. दोन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ६ फेब्रुवारीला दोघांची बिनविरोध निवड होणार आहे. दोन्ही पदांवर निवड केलेल्यांचे अवलोकन केले तर राष्ट्रवादीतील नातलगशाही आणि भाजपमधील विखेनिष्ठा याला प्राधान्य मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

महापौर पदी विराजमान होणाऱ्या ज्योती अमोल गाडे या भाजपच्या दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या आहेत. शिवाजी कर्डिले यांचे साडेतीन महिन्यांपूर्वी निधन झाले. ज्योती गाडे यांच्या निवडीमागे ही अपरिहार्यता ठरु शकते. शिवाय कर्डिले भाजपचे तर कन्या ज्योती गाडे राष्ट्रवादीच्या. त्या पुन्हा विजयी झालेल्या आहेत. त्यांची बहीण सुवर्णा संदीप कोतकर पूर्वी उपमहापौर होत्या तर आणखी एक बहीण शितल संग्राम जगताप ह्याही नगरसेविका होत्या तसेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या त्या मेहुणी आहेत. संग्राम हे शिवाजी कर्डिले यांचे जावई. त्यांनीही पूर्वी महापौरपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ज्योती गाडे, सुवर्णा कोतकर व शितल जगताप अशा तीन बहिणी नगरसेवक होण्याचा अलौकिक योग घडलेला आहे. या तीन्ही बहिणी दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या आहेत.

उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव विराजमान होणार आहेत. ते अलीकडे विखेनिष्ठ म्हणून ओळखले जातात. तसे ते मूळचे काँग्रेसचे. त्यांचे वडीलही कॉंग्रेसचे. धनंजय मूळचे विखे विरोधक काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात. नंतर ते कॉंग्रेसमध्येच असताना थोरातांपासून लांब आणि विखेंजवळ गेले. मागील निवडणुकीत काँग्रेसचे पाच नगरसेवक विजयी झाले होते. एक अपवाद वगळता इतरांना विखे यांनी उमेदवारी मिळवून देण्यात सहकार्य केले. कॉंग्रेसमधील इतरांची फाटाफूट झाली, मात्र धनंजय जाधव विखेनिष्ठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विखे यांच्यासमवेत ते भाजपवासी झाले. त्याचे फळ त्यांना मिळाले.

राष्ट्रवादी -भाजप युतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत पालकमंत्री विखे यांनी दोन्ही पदाची नावे जाहीर केली. नगरसेवकांची मते जाणून घेणे, त्यांच्या पसंतीची नावे माहिती करून घेणे असे सोपस्कार काही झाले नाहीत. थेट दोन्ही पदांसाठी नावेच जाहीर करण्यात आली. त्यातूनच नातलगशाही आणि विखेनिष्ठा हे गुण प्रबळ ठरल्याचे मानले जाते. राज्यात सर्वत्र भाजपची सरशी होत असताना नगरमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपपेक्षा अधिक संख्याबळ प्राप्त केले. त्यामुळे राज्यातील एकमेव महापौर पद राष्ट्रवादीकडे आलेले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी युती कोणाबरोबर करायची, उमेदवारी निश्चिती ते प्रचार आणि आता महापौर – उपमहापौर पदासाठी नावे ठरवणे या सर्व प्रक्रियेत जिल्ह्यातील भाजप नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे कोठेच सहभागी नव्हते. निर्णय प्रक्रियेची सर्व सुत्रे पालकमंत्री विखे व त्यांचे चिरंजीव तथा माजी खासदार सुजय विखे या पिता-पुत्रांच्या हाती एकवटली होती. मात्र निवडणुकीतून भाजपचे संख्याबळ त्यांनी वाढवले. राम शिंदे पालकमंत्री असताना मिळालेल्या संख्याबळापेक्षा विखे पिता-पुत्रांनी भाजपला अधिक यश मिळवून दिले.