अहिल्यानगर: विधान परिषदेच्या अहिल्यानगर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विरोधी सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे बिनविरोध झाले. मात्र या सर्व घडामोडीतून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे विरोधी उमेदवारी दाखल झाल्या त्या केवळ दबावतंत्राचा भाग म्हणून. या मागे होती ती राजकीय गणिते, विकासकामांसाठी निधी मिळवणे, वैयक्तिक स्वार्थ आणि बरेच काही. केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर सत्ताधारी महायुतीमधील गोंधळही यामध्ये उघड झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दत्तात्रय पानसरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष. त्यांच्या विरोधात राज्यातील भाजप संचालकांनी तक्रारी केल्या. त्यातून महासंघाची चौकशी सुरू झाली. त्यांचे अध्यक्षपदही धोक्यात आले. ही सर्व पार्श्वभूमी आणि त्यांनी दाखल केलेली उमेदवारी यांचा परस्परसंबंध अखेरच्या दिवशीच्या घडामोडीतून समोर आला. आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलाच नाही असा आक्षेप घेणारे पानसरे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाल्यानंतर घुमजाव करत उमेदवारी अर्ज मागे घेतात, यातच सर्व काही स्पष्ट होते.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील विसंवादातून अधिकृत उमेदवार दिला गेलाच नाही. काँग्रेसचे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अपक्ष अर्ज दाखल करताना, पक्षाचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आपण उमेदवारी करत असल्याचे सांगितले आणि माघार घेताना थोरात यांच्याशी चर्चाच झाली नाही असे सांगितले. श्रीरामपूर पालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आमच्या नगरसेवकांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी दाखल केली होती असे स्पष्टीकरण आता त्यांनी दिले आहे. आपल्याच भूमिकेवरून घुमजाव करणाऱ्या ससाणे यांनी स्वतःच्या उमेदवारीबद्दल संशय निर्माण करून ठेवला आहे. आघाडीतील आणखी एक ठाकरे गटाचे अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनीही कोणतेही स्पष्टीकरण न देता उमेदवारी मागे घेतली.
शेवगावमधील भाजपचे माजी नगरसेवक कमलेश गांधी यांचाही उमेदवारी अर्ज होता. त्यांच्या पत्नी पक्षाच्या नगरसेविका आहेत. नगराध्यक्ष शिंदे गटाचा आहे. मात्र महायुतीतील शिवसेना व भाजप यांच्यामध्ये वितुष्ट टोकाला गेलेले आहे. त्यातून निधी वितरण आणि विकासकामांना खीळ बसली. केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांना मिळेनासा झाला. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनही त्याची दखल घेतली जात नाही. जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांमध्येही संघर्ष सुरू आहे. भाजपमधील या अस्वस्थेकडे या उमेदवारीतून लक्ष वेधले गेले. आमदार मोनिका राजळे यांच्या मध्यस्थीने गांधी यांनी उमेदवारी मागे घेतली.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे आणि त्यातही भाजपकडे मतदारांची संख्याबळ अधिक होते. तुलनेत आघाडीकडील संख्याबळ खूपच कमी होते. तरीही महायुती आणि आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी जशा दाखल केल्या तशाच त्या मागेही घेतल्या. अखेरच्या दिवशीच्या घडामोडीतून या साऱ्यांमागील कारणेही समोर आली. एकूणच महायुतीमधील असंतोष आणि अगोदरच अशक्त असलेल्या महाविकास आघाडीतील गोंधळ या निवडणुकीतून पुन्हा एकदा समोर आला. उमेदवारी दाखल करण्यापासून ते माघारीपर्यंत सर्वत्र दबावाचे राजकारण रंगले.
