Joseph Vijay TVK Party government formation: तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच पाच दशकात बिगर द्रमुक पक्षाचे सरकार स्थापन होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांची आलटून पालटून सत्ता येत असे. यावेळी जोसेफ विजयच्या टीव्हीके पक्षाने १०८ जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी अद्यापही त्यांना १० जागांची आवश्यकता आहे. यासाठी टीव्हीकेकडून काँग्रेससह (५ जागा) इतर लहान पक्षांना सत्तेत घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र भाजपा काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती भाजपाकडून आखली जात असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी अण्णाद्रमुकमधील आमदारांचा एक गट विजयच्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडूमध्येही पक्षात फूट पडून स्वतंत्र गट तयार होणार का, हे पाहावे लागेल.

अण्णाद्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात आलेली मरगळ अद्याप दूर झालेली नाही. पक्षाकडे ठाम असे नेतृत्व नाही. यंदा ४७ आमदार निवडून आल्यामुळे अण्णाद्रमुक पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला. मात्र जोसेफ विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ला सत्तेत पाठिंबा देण्यावरून पक्षात दोन गट तयार झाले आहेत. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाकडून होणाऱ्या प्रयत्नांचाच हा एक भाग असल्याचे सांगितले जाते.

अण्णाद्रमुकच्या एका ज्येष्ठ नेत्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता दिसल्यानंतर दिल्लीमधील भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ झाले आहेत. शेजारच्या केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आल्याच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूत काँग्रेसला नवसंजीवनी मिळायला नको, असे दिल्लीतील भाजपा नेत्यांचे मत आहे.

टीव्हीके पक्षाला १०८ जागा मिळाल्या असून बहुमताची ११८ ही संख्या गाठण्यासाठी आघाडीचे सरकार येण्याशिवाय आता पर्याय नाही, हे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकनेच टीव्हीकेला पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपामधून प्रयत्न होत आहेत. जेणेकरून काँग्रेससह डाव्या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवता येईल.

thalapathy vijay net worth
थलपती या नावाने प्रसिद्ध असलेल्या जोसेफ विजयची संपत्ती किती आहे, जाणून घ्या.

सर्वात श्रीमंत आमदार लीमा रोज मार्टिन यांची भूमिका काय?

अण्णाद्रमुकच्या नेत्या आणि तमिळनाडूमधील सर्वात श्रीमंत आमदार लीमा रोज मार्टिन यांनी मंगळवारी रात्री दावा केला की, त्यांच्या पक्षाचे नेते टीव्हीकेशी सत्तास्थापनेची चर्चा करत आहेत. लीमा रोज मार्टिन यांचे विधान पक्षाची अधिकृत भूमिका नसली तरी त्यातून पक्षात सुरू असलेल्या घडामोडींची कल्पना येते. लीमा रोज मार्टिन यांचे जावई आधव अर्जुन हे जोसेफ विजय यांचे जवळचे सहकारी असून ते टीव्हीके पक्षाचे आमदारही आहेत. आघाडीच्या चर्चांमध्ये आधव अर्जून यांची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे.

भारतातील प्रसिद्ध लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची पत्नी लीमा रोज, जावई आधव अर्जुन यांचा तमिळनाडूमध्ये विजय झाला. तर मुलगा जोस चार्ल्स मार्टिन हा पुद्दुचेरीमधून भाजपाच्या मित्रपक्षातर्फे निवडून आला आहे. तिघेही वेगवेगळ्या पक्षातून निवडणुकीसाठी उभे होते. तिघांचाही विजय झाला.

अण्णाद्रमुकच्या आमदारांची बैठक फिस्कटली

निकालानंतर अण्णाद्रमुकच्या आमदारांची मंगळवारी झालेली बैठक कोणत्याही निर्णयाशिवाय फिस्कटली. आज (बुधवारी) पुन्हा एकदा आमदारांची बैठक होणार आहे. पक्षाचे महासचिव इडाप्पडी के. पलानीस्वामी यांनी जर विजयच्या पक्षाला साथ देण्यास नकार दिला तर आमदारांचा एक गट पक्षातून फुटू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विजयला पाठिंबा देण्याचे राजकारण काय?

अण्णाद्रमुकमधून विजयला पाठिंबा देण्यासाठी जो दबाव निर्माण होत आहे, त्यामागे माजी कायदा मंत्री सी. व्ही. षण्मुगम यांचा हात असू शकतो, असे अण्णाद्रमुकच्या ज्येष्ठ सूत्रांनी सांगितले. तर काही जणांच्या मतानुसार फक्त षण्मुगमच नाही तर या खेळीमागे पश्चिम तमिळनाडूमधील प्रभावशाली नेते एस. पी. वेलुमणी हे खरे सूत्रधार असू शकतात. वेलुमणी यांच्याकडे धनशक्ती आणि जनशक्ती आहे. तसेच त्यांचे दिल्लीशी चांगले संबंध आहेत. माजी आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर आणि आमदार के. कामराज हे बंडखोर आमदारांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत.

thalapathy vijay educational qualification
तमिळनाडूचा किंगमेकर थलपती विजयचं शिक्षण किती? जाणून घ्या

महाराष्ट्राप्रमाणे तमिळनाडूतही पक्ष फूटणार?

बंडखोरीचा पावित्रा घेतलेल्या आमदारांच्या गटातील एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, बुधवारच्या बैठकीत जर विजयच्या पक्षाला पाठिंबा देण्यावर एकमत झाले नाही तर फुटीची चिंता न करता आमदारांचा गट टीव्हीकेला पाठिंबा देईल.

अण्णाद्रमुकच्या ४७ आमदारांपैकी केवळ १० आमदार महासचिव इडाप्पडी के. पलानीस्वामी यांच्याकडे राहू शकतात. तर इतर आमदारांना मात्र टीव्हीकेबरोबर सत्तेत जाण्याची संधी पक्षाने गमावू नये, असेच वाटते.

अण्णाद्रमुकच्या एका आमदाराने या निर्णयाचा युक्तिवाद करताना म्हटले, “लोकांनी विजयच्या पक्षाला जनमत दिले आहे. जर त्याचा पक्ष समोरून पाठिंबा मागत आहे, तर मग अण्णाद्रमुकने सत्तेबाहेर का राहावे?” इतरांनी म्हटले की, सत्तेत सहभागी झाल्यास अण्णाद्रमुकच्या काही नेत्यांना मंत्रिपद मिळू शकेल, तसेच प्रशासकीय कामांमध्ये मदत होऊ शकेल. तसेच टीव्हीके पक्ष नवखा असल्यामुळे त्यांनाही अण्णाद्रमुकच्या अनुभवाचा लाभ मिळू शकेल.

फुटीचे अंकगणित कसे आहे?

अण्णाद्रमुकच्या एका आमदाराने सांगितले की, एकूण ४७ आमदारांपैकी वेलुमणी हे स्वतः २१ आमदारांवर प्रभाव टाकू शकतात. तर षण्मुगम यांच्याकडे किमान १० आमदारांचे पाठबळ आहे. टीव्हीकेला केवळ १० आमदारांचा पाठिंबा आवश्यक असून पक्षातून फुटून वेगळा गट तयार करण्यासाठी एवढे आमदार पुरेसे आहेत.