छत्रपती संभाजीनगर: अगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमच्या वतीने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा एमआयएमचे अध्यक्ष ॲड. असदुद्दीन ओवैसी यांनी केली. माजी खासदार विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार असतील पण त्यांचा मतदारसंघ कोणता याचा संभ्रम कायम ठेवला. मालेगावमधून मुफ्ती इस्माईल, मुंबई मतदारसंघातून रईस लष्करिया, सोलापूरमधून साजिद खान, धुळे येथून फारुक शहा यांना उमेदवारी दिली जाईल, असे ओवैसी यांनी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील विधानसभा लढतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ओवैसी त्यांची घोषणा करतील असे सांगण्यात येत होते. औरंगाबाद मध्य की औरंगाबाद पूर्व यापैकी कोणता मतदारसंघ यातील संभ्रम मात्र पुन्हा कायम ठेवण्यात आला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून डॉ. गफ्फार कादरी यांना यापूर्वी उमेदवारी देण्यात आली होती. ते सोमवारी पत्रकार बैठकीत ओवैसी यांच्या शेजारी बसले होते. मात्र, त्यांचे नाव उमेदवारींच्या यादीत नसल्याचे पत्रकार बैठकीनंतर स्पष्ट झाले.

हेही वाचा – सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा नेमका पाठिंबा कोणाला ?

हेही वाचा – नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

वक्फच्या नव्या कायद्याला अजित पवार यांनी विरोधी करावा

वक्फ कायद्यात होणाऱ्या प्रस्ताविक कायद्यास विरोध करण्यासाठी मुस्लिमांनी एकत्रित यावे व मोदी सरकारने आणलेल्या या नव्या बदलास विरोधी करणारे लेखी आक्षेप नोंदवावेत असे आवाहन करत ओवैसी यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पेच निर्माण केला. ते म्हणाले, जरी महायुतीमध्ये असलो तरी आपण धर्मनिरपेक्ष धोरण कायम असल्याचे अजित पवार सांगत असतात. या कायद्याला त्यांनी विरोधी करुन दाखवावा असे आव्हानही ओवैसी यांनी दिले.