असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) यावर्षी अरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होण्याचा विचार करत आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ही युती होण्याची चिन्ह आहेत. लालू प्रसाद आणि तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी व्यतिरिक्त विरोधी इंडिया आघाडीत काँग्रेस आणि डावे पक्ष आहेत.
बिहारमधील एआयएमआयएम नेते आरजेडी नेत्यांच्या संपर्कात आहेत. “आम्ही महाआघाडीसोबत युती करण्यास उत्सुक आहोत. आम्ही याबाबत खूप सकारात्मक आहोत. आमची विचारसरणी भाजपाला पराभूत करणे आणि बिहारला सक्षम करणे हीच आहे. भाजपासोबतची आमची लढाई काँग्रेससारखीच आहे. महाआघाडीने एआयएमआयएमला सोबत घ्यावे अशी आमची इच्छा आहे”, असे एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते आदिल हसन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
आगामी बिहार निवडणुकीत एआयएमआयएमने २४३ पैकी ५० हून अधिक विधानसभा जागा लढवण्याची योजना आखली आहे. असं असूनही पक्ष आपल्या जागा निवडण्याबाबत परिवर्तनशील आहे. जर आरजेडी आणि काँग्रेसने त्यांना सामावून घेण्यास सहमती दर्शविली तर कमी जागा लढवण्याचीही तयारी आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
बिहारमध्ये एआयएमआयएमची जागा
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम आपल्या कामगिरीने उत्साहित असल्याचे दिसून येते. त्यावेळी त्यांनी बसपा आणि राष्ट्रीय लोक समता पक्ष (आरएलएसपी)सोबत तिसरी आघाडी स्थापन केली होती. त्यानंतर एआयएमआयएमने २० जागांपैकी पाच जागा जिंकून खळबळ उडवून दिली होती. या २० जागांवर पक्षाला १४.२८ टक्के मते मिळाली होती. बसपाला त्यांनी लढवलेल्या ७८ जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आली, तर आरएलएसपी ९९ जागा लढवूनही आपले खाते उघडू शकले नाही. एआयएमआयएमने जिंकलेल्या पाचही जागा पूर्व बिहारमधील मुस्लिमबहुल सीमांचल प्रदेशात येतात. यामध्ये अररिया, पूर्णिया, कटिहार आणि किशनगंज या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
“एआयएमआयएमने मागील निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे आणि आम्ही आधीच सभापतींच्या निवडणुकीत आणि एनडीए सरकारने आणलेल्या विधेयकांवर विरोधी आघाडीला पाठिंबा दिला आहे”, असेही हसन म्हणाले. जून २०२२ मध्ये एआयएमआयएमला धक्का बसला. त्यांचे पाचपैकी चार आमदार – मुहम्मद इझहर असफी (कोचादमम), शाहनवाज आलम (जोकीहाट), सय्यद रुकनुद्दीन (बैसी) आणि अझहर नैमी (बहादुरगंज)यांनी राजदमध्ये प्रवेश केला. राज्यात एआयएमआयएमचे अध्यक्ष अख्तरुल इमान सध्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत.
महाआघाडीसोबत युती करण्याच्या प्रश्नावर इमान यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “जर तुम्हाला जातीयवादाला कमकुवत करायचे असेल तर त्यांच्या विरोधात समान विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र यावे असा प्रस्ताव आम्ही मांडला आहे. आम्ही बिहारमधील महाआघाडीसमोर हा प्रस्ताव मांडला आहे. परंतु, गोष्टींबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत काहीही निश्चित करता येत नाही.”
“एआयएमआयएम नेत्यांनी आतापर्यंत आरजेडी आणि काँग्रेस नेत्यांशी युतीसाठी कोणतीही औपचारिक चर्चा केलेली नाही”, असेही हसन यांनी सांगितले आहे. “पण, जेव्हा हे नेते विधानसभेत भेटतात तेव्हा ते आपण एकत्र निवडणूक लढवावी असे सुचवतात. एआयएमआयएमदेखील म्हणते की आपण तयार आहोत. मात्र, आरजेडीला या मुद्द्यावर निर्णय घ्यावा लागेल,” असे हसन म्हणाले.
बिहार राजदचे प्रवक्ते नवल किशोर यांनी मात्र असा दावा केला की, त्यांना महाआघाडीत सामील होण्याच्या एआयएमआयएमच्या प्रस्तावाबद्दल कोणतीही माहिती नाही. बिहार काँग्रेसचे प्रवक्ते प्रेमचंद्र मिश्रा यांनीही किशोर यांच्या विधानाचे समर्थन केले आणि त्यांना अशी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
एआयएमआयएमच्या सूत्रांनी सांगितले की, २०२० मध्ये जिंकलेल्या पाच जागांव्यतिरिक्त पक्ष मिथिलांचल, चंपारण, शहाबाद, मगध आणि भागलपूर या प्रदेशातील अनेक जागांवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. या ठिकाणी गेल्या पाच वर्षांत त्यांचे संघटन विकसित झाल्याचा दावा आहे.
जर एआयएमआयएम महाआघाडीत सामील झाले नाही तर पक्षाने ५० हून अधिक जागा स्वबळावर लढवण्याची योजनाही आखली आहे. हसन यांनी सांगितले की, “पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार जाहीर केले आहेत, ते म्हणजे पश्चिम बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील ढाका मतदारसंघातून राजपूत नेते राणा रणजित सिंग आणि सीमांचलमधील बहादूरगंज इथून तौसिफ आलम. इमान त्यांच्या अमौर मतदारसंघातून किंवा इतर एखाद्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात.”
“आम्ही ही युती करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण जर तसे झाले नाही तर त्यासाठी आरजेडी जबाबदार असेल. अशा परिस्थितीत आम्ही बिहारमधील मुस्लीम संघटनांशी संपर्क साधू”, अशी माहितीही हसन यांनी दिली.
बिहारमध्ये प्रामुख्याने सीमांचल प्रदेशात प्रवेश करण्यासाठी ओवेसी त्यांच्या पक्षाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत. बिहारमध्ये एआयएमआयएमच्या प्रवेशापासून सावध असलेल्या इंडिया आघाडीने यापूर्वी पक्षाला भाजपाची बी टीम म्हटले होते. अलीकडच्या बिहार दौऱ्यात एआयएमआयएम प्रमुखांनी सत्ताधारी भाजपा आणि जेडीयूवर हल्ला करत राजदलाही लक्ष्य केले होते. मात्र, ते काँग्रेसबद्दल मवाळ राहिले.
३ मे रोजी बहादूरगंज इथे एका रॅलीला संबोधित करताना ओवेसी यांनी आरजेडीमध्ये गेलेल्या पक्षाच्या चार आमदारांवर टीका केली होती. त्यांनी असा दावा केला की, “चार भागे तो २४ आयेंगे (जर चार आमदार पळाले तर २४ येतील)”. असं असतानाही मागासलेल्या सीमांचल प्रदेशाच्या हितासाठी त्यांच्या पक्षाचा लढा सुरूच राहील, असेही ओवेसी म्हणाले होते. आरजेडीवर टीका करताना त्यांनी असा दावा केला की, पक्षाला अखेर समर्थनासाठी एआयएमआयएमच्या आमदारांशी संपर्क साधावा लागेल.
४ मे रोजी ढाका इथे झालेल्या जाहीर सभेत ओवेसी यांनी वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध भाषण करताना लोकांना आगामी निवडणुकीत एनडीए तसेच आरजेडीला धडा शिकवण्याचे विधान केले होते. “ओवेसी साहेबांनी आरजेडीलाही लक्ष्य केले, कारण आरजेडीने बिहारवर दीर्घकाळ राज्य केले. मात्र, विकासासाठी प्रामुख्याने सीमांचलमध्ये काहीच प्रयत्न केले नाही. लोकांना नोकऱ्यांसाठी इतर राज्यांत स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय उरला नाही”, असे एआयएमआयएमच्या एका नेत्याने सांगितले.