छत्रपती संभाजीनगर – राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा मुलगा अजिंक्यचा ‘ युवा नेतृत्व’ म्हणून जाहिरातीमध्ये उल्लेख करुन ३४ कार्यकर्त्यांनी शुभेच्छा जाहिराती दिल्याने सावे यांच्या तिसऱ्या पिढीसाठी राजकीय खुर्चीची तयारी केली जात आहे. अजिंक्य हे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर मोरेश्वर सावे यांचे नातू तर मंत्री अतुल सावे यांचे चिरंजीव आहेत. विशेष म्हणजे ते सध्या भाजपमध्ये कोणत्याही पदावर सक्रिय नाहीत. परंतु आतापासूनच त्यांची प्रतिमा सामान्य माणसाच्या मनात ठसविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या काळात अजिंक्य सावे यांना एखादी संघटनात्मक जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सिडकोतील प्रभाग २३ मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे चिन्ह आणि पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या जाहिरातीतून अजिंक्य अतुल सावे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या व्यवसायात असलेल्या अजिंक्य यांचे छायाचित्रही यामध्ये खास गुलाबी रंगाच्या जॅकेटसह झळकवण्यात आले आहे. अजिंक्य सावे यांचे आजोबा मोरेश्वर सावे हे छत्रपती संभाजीनगरमधील मुरब्बी राजकारणी. ते शिवसेनेच्या (संयुक्त) पाठींब्यावर झालेले महापौर व शिवसेनेचे या मतदारसंघातील पहिले खासदार. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मोरेश्वर सावे मूळचे लातूर जिल्ह्यातील. लातूरमध्ये तत्कालीन नगरपालिकेचे सदस्य म्हणून ते निवडून गेले होते. पुढे व्यवसायाच्या निमित्ताने ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले. इथेही ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर महापौर झाले.
मोरेश्वर सावे यांना अनिल, अजित व अतुल अशी तीन मुले. त्यातील अतुल सावे हे राजकारणात असून, मागील पंधरा वर्षांपासून ते भाजपचे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. २०२२ साली महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर अस्तित्वात आलेल्या महायुतीच्या मंत्रीमंडळातही त्यांनी उद्योग विभागाचे मंत्रीपद भूषविले होते. आताही २०२४ साली पुन्हा सत्तेवर आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये सावे यांच्याकडे बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा मंत्रीपदाची जबाबदारी आहे.
अतुल सावे यांच्या निवडणुकीची सर्व सूत्रे अजिंक्य सावे यांनी सांभाळली होती. तरीही आजपर्यंत ते कधीही थेट राजकारणात उतरले नव्हते. पक्ष संघटनेतही त्यांच्याकडे कुठले पद नसल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि सिडकोतील भाजपचे एक नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी सांगितले. मात्र, आता माध्यमांतून त्यांच्या झळकलेल्या शुभेच्छा जाहिरातींमुळे त्यांचीही पावले आता राजकारणाच्या दिशेने पडत असल्याचे संकेत मिळाले आहेत. अजिंक्य यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठीच ही प्रसिद्धी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नेत्यांची मुले राजकारणात
भाजपमध्येही नेत्यांच्या मुलांना मानाचे पद देऊन घराणेशाही जपली जात आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. नुकतेच माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांना महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्त केले आहे. माजी आमदार संजय केणेकर यांचे चिरंजीवही विहिंपमध्ये सक्रिय असून, भाजपकडून महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे सांगितल्यानंतर कराड, केनेकर यांच्या मुलांना काही काळ बाजूला थांबवे लागले. आता सावे यांच्या मुलाचे फलक लागल्याने त्यांना खूर्ची कोणती, असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.
