Ajit Pawar Death : आज २८ फेब्रुवारी २०२६ आज महाराष्ट्राचे लोकनेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला असंच म्हणावं लागेल. कारण अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने बारामतीला चालले होते. बारामतीजवळ विमान लँड करताना तांत्रिक बिघाड झाला आणि अजित पवारांचं विमान कोसळलं. अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह एकूण पाच जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. २९ जानेवारीला म्हणजेच या घटनेच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Ajit Pawar Accident on 28th Jan.
अजित पवार यांचा २८ जानेवारीला अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला.

महाराष्ट्राचं राजकारण अजित पवारांविना…

महाराष्ट्राचं राजकारण अजित पवारांच्या शिवाय याची कल्पनाही कुणी केली नव्हती. अजित पवारांच्या निधनाला एक महिना उलटला आहे. महिन्याभरापूर्वी जे घडलं ते फक्त राज्यासाठीच नाही, पक्षासाठी, पवार कुटुंबासाठीच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही दुर्दैवीच ठरलं. अजित पवारांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण यापुढे बघायला मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता, लोकांची कामं करणारा नेता, मी कामाचा माणूस आहे मला माझ्या कामासाठी निवडून द्या म्हणणारा नेता म्हणजे अजित पवार. काळाने, नियतीने त्यांना हिरावून नेलं. दरम्यान २८ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. आपण जाणून घेऊ अजित पवारांच्या मृत्यूनंतर ठळकपणे काय काय घडलं.

२८ जानेवारीच्या विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू

बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे. या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला. मुंबईतून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते. तर, बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला अन् आतील प्रवाशांचा मृत्यू झाला.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला?

१) सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.

२) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अजित पवारांचं विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.

३) सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.

ajit pawar shoksabha
अजित पवारांच्या शोकसभेला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि इतर लोक उपस्थिती होते. (फोटो- सोशल मीडिया)

२८ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित पवार यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती. अजित पवार हे संघर्ष करणारे नेते होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी कठीण दिवस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान ते देत होते, त्याचवेळी त्यांचं निधन झालं ही बाब अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान झालं आहे. दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला आहे. पवार कुटुंबावरही हा मोठा आघात आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम

१) पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.

२) बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS सुविधा नाही.

३) त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागलं.

४)विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द केला गेला.

५) धुक्यात रनवेवर अलाईन करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंगचा प्रयत्न केला गेला.

६) याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला. DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.

७) लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले. सुमारे १०० फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.

८) रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले. विमान जमिनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले, ज्यात अजित पवारांसह सगळ्यांचा मृत्यू झाला.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती?

“अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला आहे. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही, पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात, “मी आज मीडियासमोर येणार नव्हतो, पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली असं कळलं. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया यात राजकारण आणू नये, एवढंच सांगायचं आहे”, असं असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. २८ जानेवारीला संध्याकाळीच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार, रोहित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांची मुलं जय आणि पार्थ पवार, त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Ajit Pawar Death News
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्या विमानाचा अक्षरशः चुराडा झाला. फोटो- अरुल होरिझॉन, इंडियन एक्स्प्रेस

२९ जानेवारीला काय घडलं?

२९ जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अशांसह सगळ्या बारामतीकरांची आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

३१ जानेवारीला काय घडलं?

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी म्हणजेच ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.अजितदादांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी त्यांनी ही शपथ घेतल्याने या निर्णयाबाबत त्यांच्यावर टीकाही झाली होती. दरम्यान फेब्रुवारी महिना उजाडला आणि अजितदादांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात याबाबत प्रश्न विचारण्यात येऊ लागले. रोहित पवार यांनी याबाबत पुढाकार घेतल्याचं पाहण्यास मिळालं.

रोहित पवार यांची १० आणि १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद आणि आरोप

रोहित पवार यांनी १० फेब्रुवारीला आणि १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांचा मृत्यू हा घातपात कसा असू शकतो याबाबत काही प्रश्न उपस्थित केले. डीजीसीए आणि VSR कंपनी यांच्या सदोष वर्तनावरही त्यांनी प्रश्न निर्माण केले. रोहित पवार यांना अमोल मिटकरींचीही साथ लाभली. तसंच या प्रकरणात निष्काळजीपणा झाला असून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी या दिवसानंतर लावून धरली.

विलीनीकरणाच्या चर्चांवरचे दावे, प्रतिदावे

संजय राऊत यांनी अजित पवारांच्या मृत्यूवरुन भाजपा सरकारवर आरोप केले. तसंच दोन्ही राष्ट्रवादी कांँग्रेसच्या विलीनीकरण्याच्या चर्चा आणि त्यावरुन आरोप-प्रत्यारोपही रंगल्या होत्या. १२ फेब्रुवारीला अजित पवारांचा पक्ष आणि शऱद पवारांचा पक्ष एकत्र येणार होता अशा चर्चा रंगल्या. शरद पवारांच्या पक्षाती नेत्यांनी यासंबंधीचे दावे केले तर अजित पवारांच्या पक्षातल्यान नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चा या फक्त निवडणुकांपुरत्या होत्या म्हणत ही चर्चा फेटाळली. आता हा विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. सुप्रिया सुळेंकडून आणि जयंत पाटील यांच्याकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

डीजीसीएची कारवाई

दरम्यान डीजीसीएने व्हीएसआर कंपनीची चार विमानं ग्राऊंड करण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या अपघातानंतर आलेला हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरला. मात्र त्यावरूनही कंपनीवर आणि डीजीसीएवर जोरदार टीका झाली. रोहित पवार यांनी पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले. तसंच संजय राऊत यांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नसून सदोष मनुष्यवध आहे अशी टीका बुधवारी म्हणजेच २५ फेब्रुवारीला केली.

रोहित पवारांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

२३ फेब्रुवारीला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात शोक प्रस्ताव मांडला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांनी अजित पवारांना आपल्या भाषाणांतून आदरांजली वाहिली होती. याच दिवशी सर्वपक्षीय शोकसभाही आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेतही अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. २७ फेब्रुवारीला रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अपघात नसून हा घातपात आहे असंही ते म्हणाले आणि आपलं पत्र देवेंद्र फडणवीस यांना दिलं. तर राज ठाकरेंना मदत करण्याचं आश्वासन मागितलं अजित पवार यांच्या निधानंतर या गोष्टी ठळकपणे घडल्या आहेत. आता आगामी काळात काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल.