Ajit Pawar Death Impact on Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (बुधवार) सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने सत्ताधारी महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…

फडणवीसांसमोरील आव्हाने वाढणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेधडक स्वभावाचे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. भाजपाप्रणीत महायुती सरकारमध्ये त्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वचक ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्यावरच अवलंबून असल्याचे सांगितले जात होते. यादरम्यान अजित पवारांच्या निधनामुळे भाजपा आणि फडणवीस यांचे शिंदे गटावर असलेला दबाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गटाचे लवकरच विलीनीकरण होणार असल्याची चर्चादेखील रंगली आहे, त्यामुळे भाजपाच्या राज्यातील वर्चस्वाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.

पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पहाटेचा शपथविधी केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या घटनेने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी दिली होती. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा आपल्या गोटात खेचून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्येही अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांच्याबरोबर अल्पकाळासाठी सरकार स्थापन करणे ही चूक असल्याची कबुली फडणवीसांनी दिली होती. मात्र, त्या निर्णयाबाबत आपल्याला पश्चात्ताप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

आणखी वाचा : Ajit Pawar Plane Crash: अजित पवार शरद पवारांच्या छायेत कसे घडले?

अजित पवारांमुळे शिंदेंना कमी महत्व?

एकसंध शिवसेनेत बंड झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे बहुमत कमी झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. पुढे या सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटही सहभागी झाला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी भाजपाने शिंदे यांना बाजूला सारून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. अजित पवार यांच्यामुळे शिंदेंच्या हातातून मुख्यमंत्रिपद गेले, असे शिंदे गटातील काही नेत्यांना आजही वाटते.

अजित पवारांची भूमिका होती निर्णायक

अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी राजकीय समतोल राखण्यासाठी अजित पवारांची भूमिका फडणवीसांसाठी महत्त्वाची ठरत होती. त्यांच्या अकाली निधनामुळे फडणवीसांनी केवळ एक राजकीय मित्रच नव्हे तर महायुतीमधील एक मोठा आधारस्तंभ गमावला असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांना भाजपाप्रणीत महायुती सरकारमध्ये सामील करून घेण्याचा निर्णय हा फडणवीसांचाच होता. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला हा निर्णय मान्य नव्हता, असे भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

अजित पवारांमुळेच फडणवीसांकडे मुख्यमंत्रिपद?

नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी मोठा विजय मिळवला. यामध्ये भाजपाने १३२ जागा जिंकल्या, तर शिंदे गटाला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. या अभूतपूर्व यशानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीच अजित पवार यांच्या मदतीने शिंदे यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवले असेही सूत्रांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी हातमिळवणी केली होती, तरीही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची इच्छा आहे. यादरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत आणि आमच्या कुटुंबातील सर्व तणाव आता संपले असल्याचे अजित पवार यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले होते.

हेही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच मोठी फूट? भाजपाच्या मंत्र्यावर अ‍ॅट्रॉसिटीची मागणी; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे काय होणार?

अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत राजकीय वर्तुळातून दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली बाब म्हणजे- विमान अपघातापूर्वीच पवार कुटुंब एकत्र येण्याच्या प्रक्रियेत होते. आता जर पूर्ण विलीनीकरण झाले तर सर्व सूत्रे शरद पवारांच्या हाती येतील. जर शरद पवार महायुतीत सामील झाले तर फडणवीस यांचे वर्चस्व कमी होऊ शकते. दुसरी बाब म्हणजे- शरद पवार यांनी महाविकास आघाडीत कायम राहण्याचा निर्णय घेतल्यास महायुतीत शिंदेंचे महत्त्व वाढेल आणि त्यांना दुर्लक्ष करणे देवेंद्र फडणवीसांसाठी कठीण जाईल. भाजपातील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत कायम राहिल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे आणखीनच दुर्लक्ष केले जाऊ शकते. अजित पवार यांच्या पत्नी किंवा मुलाकडे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.