Ajit Pawar Political Career with Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज (बुधवारी) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बारामती येथे भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेधडक स्वभावाचे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा…
अजित पवार यांची कारकीर्द
२२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे अजित पवारांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचे मूळगाव आहे. देवळालीमध्येच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्यावर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. १९९१ मध्ये त्यांची पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ते तब्बल १६ वर्ष या पदावर कार्यरत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बंधू अनंतराव पवार यांचे ते पुत्र होते. सहकार क्षेत्रात काम केल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
अजित पवार यांचा पहिला विजय
१९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि विधानसभेची निवडणूक जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये अजित पवार यांना कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. काही दिवसानंतर पाणीपुरवठा आणि अर्थ व नियोजन ही महत्वाची खातेही त्यांच्याकडे आली. शरद पवार यांनी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा अजित पवार यांनी राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना पक्षात सामील करून घेतले होते.
अजित पवार यांचे पहिले मंत्रिपद
१९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. त्यांनी काँग्रेसबरोबर युती करत राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये अजित पवार यांनी जलसंपदा खात्याचा पदभार स्वीकारत महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामीण भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. त्यावेळी अजित पवारांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा तयार झाली होती. मात्र, शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊन इतर महत्वाची खाती आपल्या पदरात पाडून घेतली. तेव्हा काका-पुतण्यांमध्ये (शरद पवार-अजित पवार) वादाची पहिली ठिणगी पडल्याचे सांगितले जाते.
अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री
२०१४ पर्यंत अजित पवार यांनी आघाडी सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांचा पदभार स्वीकारून महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये स्थान मिळवले होते. २०१० मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये अजित पवार यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते आज २०२४ पर्यंत अजित पवार यांनी तब्बल सहावेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. प्रशासकीय यंत्रणेवर मजबूत पकड ठेवणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. २०११ मध्ये सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांना विश्वासात न घेता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांना तुरुंगात टाकू, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना थेट आव्हान दिले होते.
अजित पवारांवर घोटाळ्यांचे आरोप
२०१९ मध्ये केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा संदर्भात नोटीस पाठवली होती. त्यावेळीही अजित पवार हे आमदारकी पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत होते. परंतु, शरद पवार यांनी तसे करण्यापासून त्यांना रोखले. एकीकडे तपास यंत्रणांचा दबाव अजित पवार यांच्यावर वाढत असल्याचे दिसून येत होते. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किती दिवस राजकारण करायचे? असा प्रश्न अजित पवार यांना सतत भेडसावत होता. त्यामुळेच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच काही आमदारांना सोबत घेऊन भाजपाबरोबर हातमिळवणी केली.
अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी करत महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी दिली. मात्र, अजित पवार यांना समर्थन देणारे सर्व आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. परिणामी सरकारचं बहुमत कमी झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपाची कास धरलेले अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये अजित पवार यांनी अर्थमंत्री पदही चांगल्या पद्धतीने हाताळलं. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फूट
अगदी वर्षभरातच अजित पवार यांनीही शरद पवार यांची साथ सोडत युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन अजित पवार महायुतीत सामील झाले आणि पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेला पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सहमतीमुळेच झाला होता, असा दावा अजित पवार नेहमीच करीत होते. आपल्या भाषणांमधून ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकाही करताना दिसून आले. लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रातील जनतेला काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत पाहायला मिळाली होती.
हेही वाचा : नामोनिशाण मिटवून टाकू; गणेश नाईक आणि शिंदे गटात वाद कशामुळे पेटला?
अजित पवार यांचा विधानसभेत मोठा विजय
एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर शरद पवार यांनी २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत १० पैकी आठ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला केवळ एकाच जागावर समाधान मानावे लागले होते. मात्र, या पराभवाचा बदला अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत घेतला. त्यांनी शरद पवार यांनी दिलेल्या आव्हानाचा सामना करीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवीत त्यांनी मतदारांना आपल्याकडे खेचून आणले. अखेर राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज खोटे ठरले आणि २३ नोव्हेंबरला २०२४ मध्ये लागलेल्या विधानसभा निकालात अजित पवार यांच्या पक्षाचे तब्बल ४१ उमेदवार निवडून आले.
अजित पवार सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. याच दरम्यान त्यांनी एक विक्रम आपल्या नावावर केला होता. महाराष्ट्राचे सर्वाधिक (६ वेळा) उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला होता. २०१४ ते २०१९ हा ५ वर्षांचा कार्यकाळ वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सत्तेत राहिला आहे. राज्यातील जनतेने महायुतीला बाजूने कौल दिला असून आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे पुढील ५ वर्ष महायुती सरकारला कोणताही धोका नाही, असे अजित पवार यांनी त्यावेळी सांगितले होते. अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय नेते म्हणून त्यांची ओळख होती. यादरम्यान भाजपासह देशातील विविध पक्षातील नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
