अजित पवार आणि वाद हे जणू काही समीकरण तयार झाले होते. रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजितदादांनी सहजच म्हणून केलेल्या विधानांमुळेही अनेकदा वाद निर्माण झाला होता. स्वतःची राजकीय ताकद निर्माण करण्यासाठीच त्यांनी काका शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत वेगळी चूल मांडली व त्यात ते यशस्वीही झाले होते. राज्याचे नेतृत्व करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही.

शरद पवारांनी १९९०च्या दशकात अजित पवारांना राज्याच्या राजकारणात आणले. बारामती लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये अजित पवारांना संधी दिली होती. शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात गेल्यावर अजित पवारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत विधानसभेत प्रवेश केला. सुधाकराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी अनेक चढउतार बघितले होते. १९९९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून अजित पवारांनी महत्त्वाची भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

मुख्यमंत्रीपदाची संधी गेल्याची सल कायम

विधानसभेच्या २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ७१ तर काँग्रेसचे ६८ आमदार निवडून आले होते. तेव्हा राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्याच नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होती. पण शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा मागे घेत काही अधिकची मंत्रिपदे राष्ट्रवादीला मिळवून दिली होती. तेव्हा मुख्यमंत्रीपद हुकल्याची सल अजित पवारांच्या मनात शेवटपर्यंत कायम होती. त्यांनी ती अनेकदा जाहीरपणे बोलून दाखविली होती. पक्षात फूट पडल्यावर शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाची संधी दडविल्याची भावना जाहीरपणे व्यक्त केली होती. २००९ मध्ये छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्यात आल्याने अजित पवार हे संतप्त झाले होते. तेव्हा पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर अजित पवार हे तडकपणे बाहेर पडले होते. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर मात्र अजित पवारांनी विधिमंडळ नेता हे पद पदरात पाडून घेतले.

अजित पवार हे त्यांच्या कृतीतून नेहमीच वादात अडकले. सुमारे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप होताच त्यांनी थेट राजीनामा दिला होता. काही वेळा त्यांची विधाने वादग्रस्त ठरली होती.

पहाटेचा शपथविधी

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकास आघाडी आकारास आली. त्याची प्रक्रिया सुरू असताना वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. या साऱ्या घडामोडी घडत असताना पडद्यमागे वेगळेच काही घडत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत पदांवरून वादावादी झाली. तेव्हा वकिलाकडे जायचे आहे सांगून अजित पवार बैठकीबाहेर पडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला हाच तो पहाटेचा शपथविधी. अर्थात, अजित पवारांचा तो प्रयत्न फसला. राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मुख्य प्रवाहात आले. शेवटी साडे तीन दिवसांत फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. मग अजित पवार हे निमूटपणे महाविकास आघाडीत सहभागी झाले. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा होता, पण त्यांनी नंतर भूमिका बदलली, असा खुलासा नंतर अजित पवारांनी केला होता.

शरद पवारांनाच आव्हान ते हातमिळवणी

राष्ट्रवादीच्या राजकारणात शरद पवारांनी आपली उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे आणण्यास सुरुवात केल्यापासून अजित पवार हे अस्वस्थ होते. भाजपरबरोबर सत्तेत जावे, असा राष्ट्रवादीतील नेत्यांचा मतप्रवाह होता. त्यातूनच जून २०२३ मध्ये अजित पवारांनी बंड करीत वेगळा पक्ष स्थापन केला. काका शरद पवारांनाच त्यांनी आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या पक्षाला बहाल केले. यामुळे आपलाच राष्ट्रवादी खरा, असा त्यांचा दावा होता. बंडानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचा धुव्वा उडाला. त्यांची पत्नी सूत्रेना या बारामतीमधून पराभूत झाल्या. त्यामुळे पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीत ४१ आमदार निवडून आल्याने अजित पवारांचे महत्त्व वाढले. शरद पवारांच्या छायाछत्रातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला काकांनाच निवृत्तीचा सल्ला अजितदादांनी दिला होता. पवार काका – पुतण्या एकत्र येणार का, अशी चर्चा नेहमी घडत असे, पण दोन्ही बाजू ठाम होत्या. शेवटी पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. जिल्हा परिषदेतही ही आघाडी कायम राहिली. विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचा चर्चा होत असे. पण अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे ते सारेच थांबले आहे.